राजापूरातील अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक गावे अंधारात
राजापूर : गेले चार-पाच दिवस पडणाऱ्या वळवाच्या पावसाने राजापूर तालुक्यातील अनेक गावे आजही अंधारात असल्याची बाब पुढे आली आहे. वळवाच्या पावसाने महावितरण कंपनीचा बेजजबदारपणा उघड केला असून, तालुक्याची आपत्ती व्यवस्थापन प्रणाली केवळ एक फार्स असल्याची बाय उघड झाली आहे.
मागील काळात आलेल्या तौक्ते, फयान, निसर्ग अशा विविध वादळांच्या वेळी तयार करण्यात आलेले सोशल मीडिया ग्रुप म्हणजे राजापूर तालुक्याची आपत्ती व्यवस्थापन प्रणाली झाली असून केवळ आपत्ती व्यवस्थापनच्या या व्हॉट्स अॅप ग्रुपवर मेसेज टाकण्यापलीकडे प्रशासन काहीच करत नसून ग्रामीण भागातील जनता मात्र विजेच्या प्रश्नाने हवालदिल झाली आहे. गेल्या चार दिवसात राजापूर तालुक्यातील अनेक गावे अंधारात आहेत. तर अनेक विभागाचे अधिकारी, कर्मचारी या व्हॉट्सअॅपवरील आदेशवजा सूचनांच्या मेसेजना केराची टोपली दाखवत असल्याची बाबही पुढे आली आहे.
पावसाळा सुरु होण्याअगोदर वीज वाहिन्यांवर आलेली झाडी तोडणे, खराब इन्सुलेटर बदलणे अशी कामे करणे गरजेचे असताना महावितरण कंपनीचे अधिकारी मात्र ट्रेनिंगच्या नावावर सुट्टीवर असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत सर्वसामान्य जनतेतून विचारणा केली असता, कोकणात जंगलातून व डोंगरांगातून वीजवाहिन्या गेल्यामुळे मॅन्टेनेस करणे जमत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे महावितरणच्या काही अधिकारी वर्गाकडून दिली जात असल्याने सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापनची प्रमुख जबाबदारी असणारे अधिकारीही सध्या फक्त या आपत्ती व्यवस्थापनच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर मेसेज करण्यात धन्यता मानत असून प्रत्यक्षात मात्र जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरत असल्याची बाब पुढे आली आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गेल्या दोन दिवसापासुन जिल्ह्याच्या विविध भागाचा दौरा करुन संभाव्य आपत्ती असणाऱ्या ठिकाणांचा आढावा घेत संबंधित अधिका-यांना सूचना केल्या असल्या तरी राजापूरचा आपत्ती व्यवस्थापन विभाग मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून असल्याचे चित्र आहे.
तालुक्याच्या अनेक भागात धोकादायक स्थितीत असणारे मोठे जुनाट वृक्ष, दरड प्रवण क्षेत्र, धरण प्रकल्प या ठिकाणी आपत्ती येवु नये यासाठी काळजी घेणे गरजेचे असताना प्रशासन मात्र डिम्म आहे. राजापूर शहरातही अनेक जुनाट मोठे वृक्ष असून गत वर्षी आठवडा बाजारादिवशीच एक वृक्ष कोसळून एकाला आपला प्राण गमवावा लागला होता. मात्र यावर्षी अद्यापही असे वृक्ष तोडण्याची कार्यवाही करण्यात आलेली नाही.
संभाव्य धोका लक्षात घेणे आवश्यक...
अनेक रस्त्यांच्या बाजूची गटारेही अद्यापही स्वच्छ केलेली नसून, पावसाळ्यात या गटारातील पाणी सत्यावर येऊन रस्ते वाहून जाण्याची शक्यता आहे. यावर्षी हवामान खात्याने मृगाचा पाऊस वेळेपूर्वीच दाखल होण्याची शक्यता गेल्या महिन्याभरापासून वर्तवली असून, पावसाळ्यातील संभाव्य धोक्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापन विभाग झोपा काढत असल्याची बाब पुढे आली आहे. गेल्या चार-पाच दिवसांत तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावे अंधारात असून, राजापूर तालुक्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग मात्र सुस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:08 PM 27/May/2024
What's Your Reaction?