निरंजन डावखरे यांची १२ वर्षात सभागृहात १०० टक्के उपस्थिती

Jun 20, 2024 - 17:22
 0
निरंजन डावखरे यांची १२ वर्षात सभागृहात १०० टक्के उपस्थिती

◼️ रवींद्र चव्हाण यांचे डावखरेंना विजयी करण्याचे आवाहन

◼️ जुन्या पेन्शन योजनेला येत्या अधिवेशनात मंजूरी : निरंजन डावखरे

ठाणे : गेल्या १२ वर्षात प्रत्येक अधिवेशनात विधान परिषदेत १०० टक्के उपस्थिती लावून महाराष्ट्रातील व कोकणातील प्रश्न सातत्याने मांडणारा, त्यासाठी आवाज उठविणारा व फॉलोअप घेऊन प्रश्न सोडविणारा आमदार म्हणून निरंजन डावखरे ओळखले जातात, असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल येथे काढले. 

कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार निरंजन वसंतराव डावखरे यांच्या सावरकर नगर येथे झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात प्रमुख पाहूणे म्हणून मंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते. या वेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, भरत चव्हाण, एकनाथ भोईर, राधाबाई जाधवर, दिगंबर ठाकूर, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे अध्यक्ष सचिन मोरे, शिवाई विद्यालयाच्या अध्यक्षा सुलेखा चव्हाण, आर. जे. ठाकूर कॉलेजचे विश्वस्त मंगेश ठाकूर आदी उपस्थित होते. या मेळाव्याला ठाणे परिसरातील विविध शाळांचे संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातत्यपूर्ण कार्यशील उमेदवार असलेले निरंजन डावखरे यांना निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बळावर नियोजनबद्ध प्रयत्न करायला हवेत. प्रत्येकी २५ मतदारांची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारायला हवी, मतदारांबरोबर संपर्क ठेवणे, मतदान कसे करावे, याची माहिती देणे, मतदान बाद होणार नाही याची काळजी घेणे, याकडे लक्ष दिल्यास निरंजन डावखरे हे विक्रमी मताधिक्याने निवडून येतील. अशी आशा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. 

निरंजन डावखरे यांना इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी करा की ठाण्याच्या नादी लागण्याची हिंमत पुन्हा कोणी करणार नाही, असे उद्गार खासदार नरेश म्हस्के यांनी काढले. तर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सरकारी कर्मचारीवर्गासाठी जुनी पेन्शन योजनेला येत्या अधिवेशनात निश्चितच मंजूरी मिळेल, असा विश्वास उमेदवार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:50 20-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow