देवरुखात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद; गुन्हा दाखल केल्यानंतर ४ तासानंतर सेवा पूर्ववत

Jun 24, 2024 - 11:12
 0
देवरुखात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद;  गुन्हा दाखल केल्यानंतर  ४ तासानंतर सेवा पूर्ववत

देवरूख : देवरूख एसटी आगारातील बसचा ओव्हरटेक करताना रिक्षाला धक्का लागल्याने रिक्षा उलटली. या घटनेत एसटी चालकाला दुसऱ्याच व्यक्तीने येऊन जबर मारहाण केली. यावरून एसटी कर्मचारी यांनी 'काम बंद' आंदोलन केले. त्यामुळे ऐन रविवारी आगारात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. अखेर मारहाण करणाऱ्या संशयिताविरोधात देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर कर्मचाऱ्यांनी एसटी बसफेऱ्या तब्बल ४ तासांनी सुरू केल्या आणि प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

रविवारी सकाळी ६.३० वाजता देवरूख संगमेश्वर एसटी घेऊन चालक एस. ए. पाटील जात होते. बस सह्याद्रीनगर येथे आली असता याचवेळी गोपीनाथ पवार हे आपल्या ताब्यातील रिक्षा साडवलीच्या बाजूने जात होते. याच रिक्षाला ओव्हरटेक करताना एसटीची वाहकाच्या बाजूने रिक्षाला धडक बसली. यात रिक्षा उलटली. यात रिक्षातील महिला यानंतर जखमी झाली. तसेच रिक्षाचे किरकोळ नुकसान झाले.

या अपघाताची माहिती मिळताच बोलेरे (एमएच ०८- ६७४४) वाहन घेऊन आलेल्या एका व्यक्तीने एसटी चालकाला पोलिस ठाण्याजवळून घटनास्थळी जाऊया, असे सांगत वाहनात बसवून नेले. वाहन मराठा भवन येथे थांबवून त्या व्यक्तीने पट्ट्याच्या सहाय्याने चालक पाटील यांना बेदम मारहाण केली. यात चालकाला गंभीर दुखापत झाली. चालकाने तत्काळ देवरुख पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी चालकाला ग्रामीण रुग्णालयात नेऊन उपचार करुन आणले. दरम्यान, चालकाला मारहाण झाल्याची माहिती मिळताच एसटी आगारातील सर्वच कर्मचारी संघटना एकवटल्या. मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही, तो पर्यंत एकही बस आगारातून सुटणार नाही, असे जाहीर करुन सकाळी ११.१५ पासून एसटी फेऱ्या बंद करण्यात आल्या. 

रविवार असल्याने बसस्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. कर्मचारी आंदोलनावर ठाम राहिल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. मात्र ग्रामीण भागात एसटीव्यतीरिक्त प्रवासाचे साधन नसल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अखेर प्रभारी आगार व्यवस्थापक कैलास साबळे यांनी पोलीस ठाण्यात जावून कर्मचारी यांचे आंदोलन व प्रवाशांचे हाल यावरुन चालकाला मारहाण झाल्याबाबत तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. ही प्रत साबळे यांनी आगारात येवून कर्मचारी यांना दाखवून एसटी फेऱ्या सुरु करण्याच्या सूचना केल्या. यामुळे तणावाचे वातावरण शांत होऊन तब्बल चार तासांनी दुपारी ३.३० वाजता सर्वच मार्गावरील एसटी फेऱ्या सुरु करण्यात आल्या. या प्रकरणी पोलिस ठाण्यात भारतीय वाहन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास निरीक्षक संजय पाटील करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 24/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow