लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध नाही, इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jun 25, 2024 - 12:42
 0
लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध नाही, इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांनी भरला उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. एनडीएकडून ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार बनवण्यात आले आहे.

एनडीएच्या मित्रपक्षांनी ओम बिर्ला यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. तर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना ओम बिर्ला यांना समर्थन देण्याची विनंती केली होती. विरोधकांनी प्रथेनुसार एनडीएकडे उपाध्यक्षपदाची मागणी केली होती. मात्र त्याबाबत कोणताही प्रतिसाद न आल्याने आता इंडिया आघाडीने लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

लोकसभा अध्यक्षपदावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत झालेले नाही. ओम बिर्ला यांनी एनडीएच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांच्या मागणीवर कोणताही प्रतिसाद न आल्याने के. सुरेश यांनीही अध्यक्षपदासाठी उमेदवारीही दाखल केली आहे. उपसभापतीपद देण्याची अट पूर्ण न झाल्याने इंडिया आघाडीने उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे भारतीय लोकशाहीच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. मात्र संख्याबळ पाहता एनडीएच्या उमेदवाराचा सभापतीपदाच्या निवडणुकीत विजय होण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या निकालानंतर अध्यक्षपदासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये एकमत झालेलं नाही. त्यामुळे भारतीय इतिहासात पहिल्यांदाच लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. इंडिया अलायन्स काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांना सभापतीपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने उमेदवारी दाखल केली.

दरम्यान, यासाठी राहुल गांधी यांनी सरकारला जबाबदार धरले. विरोधकांनी सभापतीपदासाठी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पण प्रथेप्रमाणे उपसभापतीपद विरोधकांना द्यावे, असा आमचा मुद्दा होता, अशी परंपरा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या या अटीवर पियुष गोयल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "आम्ही अटींच्या आधारे पाठिंबा देण्याचे समर्थन नाकारतो. विरोधक अटींच्या आधारे पाठिंबा देण्याबाबत बोलत आहेत. लोकसभेच्या परंपरेत असे कधीच घडले नव्हते. लोकसभा अध्यक्ष किंवा उपसभापती हे कोणत्याही पक्षाचे नसून ते संपूर्ण सभागृहाचे आहेत," असे गोयल म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:06 25-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow