ओम बिर्लांकडून आणीबाणीची आठवण, दोन मिनिटांचं मौन, विरोधकांचा लोकसभेत गदारोळ

Jun 26, 2024 - 14:32
Jun 26, 2024 - 15:13
 0
ओम बिर्लांकडून आणीबाणीची आठवण, दोन मिनिटांचं मौन, विरोधकांचा लोकसभेत गदारोळ

नवी दिल्ली : त्ताधारी आणि विरोधकांवर रंगलेल्या जुगलबंदीनंतर अखेर एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची आज लोकसभेच्या अध्यक्षपदी आवाजी मतदानाद्वारे निवड झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिर्ला यांना सन्मानपूर्वक अध्यक्षपदाच्या आसनावर विराजमान केले.

मग विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी ओम बिर्ला यांना शुभेच्छा देताना खोचक टोलेबाजीही केली होती. मात्र नंतर आभार व्यक्त करत नव्या लोकसभेतील पहिलं भाषण करताना ओम बिर्ला यांनी जो पवित्रा घेतला. त्यामुळे विरोधी पक्ष अवाक् झाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून सातत्याने संविधानावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या विरोधकांना ओम बिर्ला यांनी १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवरून खूप सुनावले. तसेच आणीबाणी हा लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा अध्याय असल्याची टीका केली. एवढंच नाही तर या मुद्द्यावरून काँग्रेसची कोंडी केली. मात्र यादरम्यान, सभागृहात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला.

दरम्यान, लोकसभेचे अध्यक्ष, ओम बिर्ला म्हणाले की, हे सभागृह १९७५ मध्ये आणीबाणी लावण्याच्या घेण्यात आलेल्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध करते. तसेच या आणीबाणीचा विरोध करणाऱ्या, त्याविरोधात संघर्ष करणाऱ्या आणि लोकशाहीचे संरक्षण करणाऱ्या सर्वांच्या दृढ संकल्पाचं आम्ही कौतुक करतो.

२५ जून १९७५ हा दिवस भारताच्या इतिहासामध्ये नेहमीच एक काळा अध्याय म्हणून ओळखला जाईल. या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेवर हल्ला केला. भारताला जगभरातील लोकशाहीची जननी म्हणून ओळखलं जातं. भारतामध्ये नेहमी लोकशाही मूल्ये आणि वादविवादाचं समर्थन केलेलं आहे., असेही ओम बिर्ला म्हणाले.

ओम बिर्ला यांनी पुढे सांगितले की, भारतात लोकशाही मूल्यांचं नेहमी रक्षण केलं गेलं आहे. त्यांना नेहमी प्रोत्साहन देण्यात आलं आहे. अशा भारतावर इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली. भारताच्या लोकशाही मूल्यांना चिरडलं गेलं आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा गळा आवळण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:36 26-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow