संगमेश्वर : मुबलक पाणी मिळेल तिथे विहीर खोदा; येडगेवाडीतील ग्रामस्थांची मागणी

Jul 1, 2024 - 13:51
 0
संगमेश्वर : मुबलक पाणी मिळेल तिथे विहीर खोदा; येडगेवाडीतील ग्रामस्थांची मागणी

संगमेश्वर : तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी येथील जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी योजना मंजूर झाली आहे. तेथील योजनेच्या विहिरीचे काम येडगेवाडी येथील तिवटी या ठिकाणी सुरू करण्यात आले; मात्र तिथे येडगेवाडीला पुरेल इतके पाणी उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणची विहीर रद्द करून संपूर्ण बेडगेवाडीला पुरेल इतक्या क्षमतेची विहीर खोदाची, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.

येडगेवाडीची लोकसंख्या ५०९ आहे, तर २०५३ ची संकल्पित लोकसंख्या ही १५९ होते. येडगेवाडीला प्रतिदिन ६३ हजार लिटर पाण्याची मागणी आहे; मात्र सध्या येडगेवाडी तिवटी या ठिकाणी विहीर खोदली आहे. त्या विहिरीत ३ एप्रिल २०२४ ला तत्कालीन उपअभियंत्यांनी केलेल्या तपासणीत प्रतिदिनी ३५०० लिटर पाणी येत असल्याचे कनिष्ठ भूवैज्ञानिकांना पत्राद्वारे कळवले आहे. हे पाणी येडगेवाडीसाठी पुरेसे नाही.

येडगेवाडीची भविष्यातील पाण्याची मागणी लक्षात घेऊन राजिवली सरपंचांनी १३ मार्च २०२४ ला आणि आमदार शेखर निकम यांनी विहिरीची जागा बदलण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी ५ एप्रिलला नळपाणी योजनेच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ग्रामीण पुरवठा उपअभियंत्यांना एप्रिल अखेरपर्यंत तीवटी येथील विहिरीची खोली आणि रुंदी वाढवल्यानंतर पाणीपातळीच्या नोंदी घेऊन तसा अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते, मात्र सीईओंच्या आदेशाची अंमलबजावणीच झाली नाही. चुकीच्या पद्धतीने होत असलेले खोदकाम थांबवून तिवटीतील विहीर रद्द करावी तसेच मुबलक पाणी मिळेल अशा ठिकाणी नवीन विहीर तयार करून तिथून नळपाणी योजना राबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

येडगेवाडी नळपाणी योजना कामावच्या मूळ अंदाजपत्रकात पाचांबे गायकवाडवाडी या ठिकाणची लांबी समाविष्ट आहे, तर या मार्गिकेसाठी पाईप घेतले आहेत. येथील खर्च हा नियोजबद्ध होत आहे: मात्र मूळ अंदाजपत्रकानुसार काम केले तर कामात पैसे उरणार नाहीत आणि त्यातून काही फायदा होणार नाही. म्हणून वाडीतच विहीर करून दीड कोटीचे काम ६० लाखांत आटोपून उर्वरित पैशांमध्ये इतर कामे दाखवून भ्रष्टाचार करता येईल यासाठी सर्व अट्टहास सुरू आहे: मात्र आम्ही ही योजना मूळ अंदाजपत्रकानुसार करण्यासाठी आग्रही आहोत. संतोष येडगे, माजी उपसरपंच, राजिवली

कुटगिरी-येडगेवाही नळपाणी योजना तिवटी येथील नव्याने खोदकाम केलेल्या विहिरीतून येडगेवाडीची तहान भागणार नाही म्हणून येडगेवाडी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाला सह्यांचे निवेदन देण्यासाठी पुढाकार घेतला. सह्यांचा टप्पा पूर्ण करत असताना येडगेवाडीतील यशवंत गोविंद  पेडगे यांनी आमची दिशाभूल करून ग्रामसभा आहे त्यासाठी तुमच्या सहया हव्या आहेत, असे खोटे सांगून तिवटी येथील विहीर समर्थनार्थ सह्या घेतल्या. या सह्या जिल्हा परिषद प्रशासनाने ग्राह्य धरू नयेत. तिवटी येथील विहिरीतील पाणी संपूर्ण येडगेवाडीची तहान भागवणार नाही, या मतावर मी ठाम आहे. - बारकू येडगे, ग्रामस्थ, येडगेवाडी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow