डॉक्टर दिनानिमित्त आयएमए रत्नागिरीतर्फे विशेष सन्मान सोहळा

Jul 2, 2024 - 13:41
 0
डॉक्टर दिनानिमित्त आयएमए रत्नागिरीतर्फे विशेष सन्मान सोहळा

रत्नागिरी : आयएमए रत्नागिरी शाखेतर्फे डॉक्टर दिनाचे औचित्य साधून एक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. अतुल ढगे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले आणि डॉक्टरांच्या अद्वितीय योगदानाचे कौतुक केले व डॉ मतीन परकार यांनी उपस्थितांना हार्ट फेल्युअर या विषयी मार्गदर्शन केले.

या सन्मान सोहळ्यात आपल्या नेतृत्वाखाली रुग्णसेवेची गुणवत्ता आणि सेवा स्तर उंचावल्याबद्दल शासकीय रुग्णालय रत्नागिरीचे सिव्हिल सर्जन डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी चे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा आयएमए रत्नागिरी चे अध्यक्ष डॉ अतुल ढगे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तर आपल्या कुशल व्यवस्थापनाने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत लक्षणीय सुधारणा घडवून आणल्याबद्दल रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, मानसिक आरोग्य सेवांमध्ये त्यांनी केलेल्या कार्याबद्दल प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, यांचा आयएमए रत्नागिरीच्या पूर्व अध्यक्ष्या डॉ तोरल शिंदे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

वैद्यकिय क्षेत्रासोबतच समाजसेवेसाठी झटणाऱ्या, समाजामध्ये जाऊन समाजासाठी काम करणाऱ्या, तसेच ज्यांनी वैदयकिय क्षेत्रातील आपली कामगिरी बजावतानाच ईतर क्षेत्रामध्येही उल्‌लेखनिय कामगिरी केली आहे अशा आयएमए च्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना, लायन्स चॅरीटेबल ट्रस्ट, लायन्स नेत्र रुग्णालय, आनंदघर अशा विविध संस्थेमार्फत समाजसेवा करणाऱ्या डॉ संतोष बेडेकर यांचा, परकार फाउंडेशनच्या मार्फत काम करणाऱ्या डॉ. अलीमिया परकार यांचा, आर्ट सर्कल रत्नागिरीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ रवींद्र गोंधळेकर आणी डॉ मेधा गोंधळेकर यांचा सन्मान आयएमए चे अध्यक्ष डॉ अतुल ढगे यांच्या हस्ते करण्यात आला. 

HIV/AIDS प्रभावित व्यक्तींसाठी कार्य तसेच HIV विषयी माहिती, शिक्षण, आणि जनजागृती करणाऱ्या, आरोग्यविषयक विविध शिबिरांचे आयोजन करणाऱ्या डॉ. रश्मी आठल्ये, रत्नागिरीसारख्या ग्रामीण भागात Artificial Reproductive medicine ला आपले जीवन समर्पित करून अनेक दांपत्यांना त्यांच्या कुटुंबाचे स्वप्न साकार करण्याची संधी देणाऱ्या डॉ. तोरल शिंदे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा एक भाग म्हणून शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. कल्पना मेहता, माइंडकेअर मॅराथॉन, जागर मनोआरोग्याचा, मनोमित्र कार्यशाळां, माइंकेअर एक्सप्रेस  या कार्यक्रमांद्वारे महाराष्ट्रात आणि भारतात मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी अपार मेहनत घेणाऱ्या व बॉर्न टू विन मार्फत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या डॉ. अतुल ढगे यांचा सन्मान शासकीय रुग्णालय रत्नागिरीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. 

गरीब आणि वंचित व्यक्तींसाठी अनेक उपक्रम राबवणाऱ्या व आविष्कार संस्थेसोबत काम करणाऱ्या डॉ. शरद प्रभुदेसाई, आविष्कार सोसायटी व अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना करून विशेष गरजां असलेल्या मुलांसाठी व व्यक्तींच्या व्यवसाय पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या डॉ. शाश्वत शेरें, अभिनय आणि नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. शशांक पाटील, अनेक राष्ट्रीय कार्यक्रमात व्याख्याते आणि वक्ते म्हणून मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ. निलेश नाफडे यांचा सन्मान रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्या हस्ते करण्यात आला. 

रत्नागिरीतील विविध सामाजिक प्रश्नांवर वर्तमानपत्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी आवाज उठविणाऱ्या व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेणाऱ्या डॉ. समीर जोशी, वीरश्री ट्रस्टच्या माध्यमातून वंचित मुलांना आर्थिक मदत, विकासात्मक समुपदेशन, आणि आरोग्यदायी जीवनशैली राखण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. निलेश शिंदे, Best Secretary म्हणून तीनदा राज्यशाखेकडून गौरविण्यात आलेल्या व नाटक, वेबसिरीज व चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत सहभाग घेणाऱ्या डॉ. नितीन चव्हाण यांचा सन्मान प्रादेशिक मनोरुग्णालयाचे रत्नागिरीचे वैदयकीय अधिक्षक डॉ. संघमित्रा फुले यांच्या हस्ते करण्यात आला. 

पक्षी छायाचित्रणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. उदय वंडकर, विविध मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रचार करणाऱ्या डॉ. विवेक पोतदार, कला, नाटक, लेखन आणि वक्ते म्हणून मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ. निनाद नाफडे यांचा सन्मान IMA चे सचिव डॉ. योगेश सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ स्म्रिती प्रभुदेसाई व निकिता वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करताना डॉ. अतुल ढगे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:10 02-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow