संगमेश्वर : कडवईतील रिक्षा चालकांनी श्रमदानातून बुजवले खड्डे

Jul 12, 2024 - 12:04
Jul 12, 2024 - 14:06
 0
संगमेश्वर : कडवईतील रिक्षा चालकांनी श्रमदानातून बुजवले खड्डे

कडवई : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ- कडवई-चिखली रस्त्याचे काम भर पावसात केल्याने पहिल्या पावसातच रस्त्याला खड्डे पडू लागले आहेत. यासंदर्भात रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनसुद्धा दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडू लागले आहेत. रस्त्याला सर्व ठिकाणी गटारे नाहीत व काही ठिकाणी मोऱ्या काढणे गरजेचे होते. परंतु त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असते. वाहत्या पाण्याने रस्त्याचे डांबरीकरण ठिकठिकाणी उखडू लागले आहे, नागरिकांना या खड्यातून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व समस्यांना कंटाळून पाऊस थांबताच रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने या मार्गावरील खड्डे भरणीचे काम सुरू करण्यात आले. रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने ठेकेदाराला फोनद्वारे रस्ता दुरुस्ती संदर्भात चर्चा करण्यात आली होती.

तसेच बांधकाम विभागाला देखील कल्पना देण्यात आली होती. तरीही दोघांनी रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले परिणामी खड्डे मोठे होत गेले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भूमिकेबद्दल नागरिकांमध्ये नाराजी पहावयास मिळत आहे. रिक्षा चालक संदीप चिले, श्रीकांत डिंगणकर, तुषार कदम, महेश कानाल, उदय चाचे, नितीन कानाल, अनिकेत पवार, सुधीर पंडव, रफिक काइझरी यांनी एकत्र येत तुरळ-कडवई - चिखली मार्गावरील खड्डे भरण्याचे काम स्वखर्चाने केले. रिक्षा चालकांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 12/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow