"आपण एकत्र यायलाच पाहिजे"; विधान भवनाच्या पायऱ्यांवर संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

Jul 12, 2024 - 14:57
 0
"आपण एकत्र यायलाच पाहिजे"; विधान भवनाच्या पायऱ्यांवर संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज होत असलेल्या मतदानानिमित्त सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि आमदार विधिमंडळात दाखल झाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत हेदेखील या परिसरात आले होते. यावेळी राऊत यांची भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भेट झाली. या भेटीत संजय राऊत यांनी उच्चारलेल्या एका वाक्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. आपण तर पुन्हा एकत्र आलंच पाहिजे, असं राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर चंद्रकांत पाटील दिसताच संजय राऊत हे त्यांच्या दिशेने गेले आणि पाटील यांना मिठी मारत हस्तांदोलन केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी हसत-हसत गप्पाही मारल्या. चंद्रकांत पाटील यांना पाहताच राऊत गमतीशीरपणे म्हणाले की, अरे...आपण तर पुन्हा एकत्र यायलाच हवं. त्यावर पाटील यांनी म्हटलं की, तुमचं हे वाक्य आजची लाइन होईल. त्यावर उत्तर देत मी नेहमी लाइनच देत असतो, असं राऊत म्हणाले.

भेटीनंतर संजय राऊतांकडून स्पष्टीकरण

संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांसोबतच्या भेटीत उच्चारलेल्या वाक्यावरून तर्क-वितर्क लावले जाऊ लागल्यानंतर राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिलं आहे. "चंद्रकांत पाटील हे आमचे जुने मित्र आहेत. दिल्लीत आम्ही पंतप्रधान मोदींना भेटतो, अमित शाह हेदेखील आम्हाला भेटतात आणि हातात हात घेतात. चंद्रकांत पाटील हे राज्याचे मंत्री आहेत, त्यांचं आणि आमचं काय वैयक्तिक भांडण आहे का? हे भांडण राजकीयदेखील नाही. आमचं भांडण वैचारिक आहे आणि ते तसंच राहील," असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, विधिमंडळ परिसरात राजकीय विरोधकांच्या होणाऱ्या भेटीगाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही विधिमंडळाच्या लिफ्टमध्ये भेट झाली होती. तसंच चंद्रकांत पाटील यांनीही चॉकलेट देत उद्धव ठाकरेंशी संवाद साधला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:25 12-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow