एसटी प्रवाशांनी टाकलेल्या हजारो प्लास्टिक बाटल्यांचे दापोलीत संकलन

Jul 12, 2024 - 14:42
Jul 12, 2024 - 15:01
 0
एसटी प्रवाशांनी टाकलेल्या हजारो प्लास्टिक बाटल्यांचे दापोलीत संकलन

रत्नागिरी : एसटी प्रवाशांनी टाकलेल्या हजारो प्लास्टिक बाटल्यांचे दापोलीत संकलन करण्यात आले. जालगाव येथील निवेदिता प्रतिष्ठान, सरस्वती विद्यामंदिर आणि दापोली एसटी आगाराचा हा संयुक्त उपक्रम गेले वर्षभर सुरू आहे.

या प्रकल्पाला दापोलीमधील शाळा-महाविद्यालयांचे सदोदित सहकार्य लाभत आहे. या सातत्यपूर्ण कार्यक्रमानुसार आज सरस्वती विद्यामंदिरच्या सहकार्याने प्रवाशांनी प्रवास करताना एसटीत टाकलेल्या सुमारे साडेतीन हजार प्लास्टिक बाटल्या निवेदिता प्रतिष्ठानच्या जालगाव येथील संकलन केंद्रात जमा करण्यात आल्या. या बाटल्या यंत्रणेमार्फत आगारात दररोज एका बाजूला जमा केल्या जातात आणि तीन महिन्यांतून एकदा निवेदिता प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेतर्फे पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवल्या जातात. गाडीत आणि स्थानकावरील खाऊच्या रॅपर्सचा कचरादेखील संस्थेतर्फेच पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवला जातो.

आज झालेल्या प्लास्टिक संकलन कार्यक्रमात सरस्वती विद्यामंदिरचे विद्यार्थी, मुख्याध्यापिका सारिका गुजराथी, पंकज तुळपुळे आणि पल्लवी दाबके मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. या संकलन कार्यात निवेदिता प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य रमेश जोशी, साटम, महेश्वरी विचारे, विद्याधर ताम्हणार, सुनील चव्हाण, निवेदिता परांजपे, वैभवी सागवेकर, प्रमोद रसाळ, अध्यक्ष प्रशांत परांजपे, आगार प्रमुख रेश्मा मधाळे, अधीक्षक मुनाफ राजापकर, प्रणव रेळेकर, एसटीचे अधिकारी व कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग लाभला.

गेल्या वर्षभरात एसटीतील प्रवाशांनी प्रवास करताना एसटीत टाकलेल्या सुमारे दहा हजारपेक्षा अधिक प्लास्टिक बाटल्या पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यात यश आल्याची माहिती निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:25 12-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow