Kolhapur : पंचगंगा धोका पातळीकडे; सतर्कतेचा इशारा

Jul 23, 2024 - 10:25
 0
Kolhapur : पंचगंगा धोका पातळीकडे; सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर : चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी दिवसभर उसंत घेतली. मात्र, रात्री पावसाचा जोर वाढला. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पंचगंगेच्या पातळीत वाढ सुरूच आहे. पंचगंगेने सोमवारी रात्री 12 वाजता 40 फूट पातळी गाठली. पंचगंगा इशारा पातळी ओलांडून आता धोक्याच्या पातळीकडे चालली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्ग मात्र आजही बंदच होता; तर इचलकरंजीचा कर्नाटकशी रात्री उशिरा संपर्क तुटला. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून असलेला पावसाचा जोर सोमवारी सकाळपासून कमी झाला आहे. शहर आणि परिसरात तर काही काळ सूर्यदर्शनही झाले. अधूनमधून कोसळणार्‍या सरी वगळता पावसाने उघडीप दिली. यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी धरण आणि नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत संथ वाढ सुरूच आहे.

रविवारी रात्री 38.4 फुटांवर असलेली पंचगंगेची पातळीही रात्रभर संथगतीने वाढत गेली. सोमवारी सकाळी 11 वाजता पंचगंगा 39 फूट या इशारा पातळीवर पोहोचली. यानंतरही त्यात वाढ सुरूच राहिली. सायंकाळी 5 वाजता पाणी पातळी 39.5 फुटांवर गेली. रात्री दहा वाजता पाणी पातळी 39.10 फुटांवर गेली. पंचगंगा पाणी पातळीत वाढ सुरूच असून, ती संथगतीने 43 फूट या धोका पातळीकडे चालली आहे

78 बंधारे अद्याप पाण्याखालीच; कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंदच

जिल्ह्यातील नऊ बंधार्‍यांवरील पाणी उतरले आहे. त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. सोमवारी दुपारपर्यंत 78 बंधारे पाण्याखाली होते. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर अद्याप पाणी असल्याने हा मार्ग सलग दुसर्‍या दिवशी बंद राहिला. अणुस्कुरा मार्गावर वरणमळी येथे आलेले पाणी ओसरल्याने मलकापूर-अणुस्कुरा हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला. मात्र, काटे-करंजफेण मार्गावर अद्याप पाणी असल्याने कळे-बाजारभोगावमार्गे अणुस्कुरा हा मार्ग आजही बंद राहिला. याखेरीज 8 राज्यमार्ग, 16 प्रमुख जिल्हा मार्ग, 6 इतर जिल्हा मार्ग व 14 ग्रामीण मार्ग असे एकूण 44 मार्ग पाणी आल्याने बंद आहेत.

कोल्हापूर शहरासह तीन तालुक्यांत अतिवृष्टी

जिल्ह्यात सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासांत सरासरी 51.3 मि.मी. पाऊस झाला. शाहूवाडी (92), पन्हाळा (76.3) व गगनबावड्यात (70.2) अतिवृष्टी झाली. कोल्हापूर शहरातही अतिवृष्टी झाली असून, गेल्या 24 तासांत 68 मि.मी. पाऊस झाला. चंदगड तालुक्यात 59.1 मि.मी., राधानगरीत 56.5 मि.मी., करवीरमध्ये 54.9 मि.मी., कागलमध्ये 44.4 मि.मी., भुदरगडमध्ये 43.8 मि.मी., आजर्‍यात 43.4 मि.मी., हातकणंगलेत 40.7 मि.मी., शिरोळमध्ये 25.4 मि.मी., तर गडहिंग्लज तालुक्यात 23.6 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यातील 22 ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली.

14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

जिल्ह्यातील प्रमुख 16 धरणांपैकी चिकोत्रा (50 मि.मी.) व आंबेओहळ (32 मि.मी.) वगळता उर्वरित 14 धरण क्षेत्रांत सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत अतिवृष्टीची नोंद झाली. कोदे धरण क्षेत्रात 264 मि.मी., तर तुळशी परिसरात 239 मि.मी. पाऊस झाला. जंगमहट्टीत 84 मि.मी. पाऊस झाला. अन्य 11 धरण क्षेत्रांत 100 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला.

राधानगरी 85 टक्के भरले; 13 धरणांतून विसर्ग

जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ आणि कोदे ही पाच धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. राधानगरी धरण 85 टक्के भरले. वारणा धरणही 80 टक्के भरले आहे. यामुळे धरणातील वक्राकार दरवाजातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. चिकोत्रा, दूधगंगा व तुळशी वगळता उर्वरित सर्व 13 धरणांतून पाण्यांचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधार्‍यावरून सकाळी 51 हजार 207 क्युसेक विसर्ग सुरू होता. दुपारनंतर तो 55 हजार 539 क्युसेक इतका वाढला. पन्हाळा तालुक्यातील आंबर्डे येथील दरड प्रवण क्षेत्रातील दोन कुटुंबातील 16 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यासह कोल्हापूर शहरातील सुतारवाडा परिसरातील 4 कुटुंबातील 20 नागरिकांना स्थलांतरित केले आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात विविध ठिकाणी 51 घरांची पडझड झाली.

वेळेत स्थलांतरित व्हा : जिल्हाधिकारी

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे पंचगंगा धोका पातळीकडे सरकत आहे. पाण्याची पातळी वाढत राहिल्यास पुराचे पाणी येणार्‍या भागातील नागरिकांनी वेळेत स्थलांतरित होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. पूरस्थितीच्या अनुषंगाने कोल्हापूर महापालिकेने 2021 मध्ये शहरात महापुराचे पाणी आलेल्या ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. यामुळे पूर पातळी जशी वाढत जाईल, त्यानुसार शहरातील त्या त्या ठिकाणच्या नागरिकांनी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 23-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow