मराठा आंदोलक आज 'मातोश्री'वर धडकणार...

Jul 30, 2024 - 11:18
Jul 30, 2024 - 11:29
 0
मराठा आंदोलक आज 'मातोश्री'वर धडकणार...

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासह इतरही मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली जात आहे.

याच मागणीला घेऊन खासदार शरद पवार छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर आंदोलन करणार आहेत. त्यासाठी मराठा आंदोलकांच्या (Maratha Protest) गाड्यांचा ताफा मातोश्रीकडे रवाना झाला आहे.

उद्धव ठाकरे न भेटल्यामुळे आंदोलक नाराज

मराठा आंदोलकांच्या या भूमिकेनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आज मातोश्रीसमोर आंदोलन करणार आहे. सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने काल (29 जुलै) मातोश्रीवर धडक दिली होती. उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली होती. मात्र सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला न भेटता उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडले होते. ठाकरेंची भेट न झाल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आज मातोश्रीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन करणार आहे.

पोलिसांनी मातोश्रीबाहेर बंदोबस्त वाढवला

उद्धव ठाकरे जबाब दो ! असे म्हणत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. 30 जुलैच्या दुपारी 12 वाजता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते मातोश्री येथे जमणार आहेत. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या याच भूमिकेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मातोश्रीच्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

सी-लिंकवर आंदोलकांना रोखण्याची शक्यता

तर दुसरीकडे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या (Maratha Kranti Thok Morcha) कार्यकर्त्यांच्या गाड्या मातोश्रीकडे निघाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या आंदोलकांना वरळी येतील सी-लिंकवर अडवले जाऊ शकते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 30-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow