Kolhapur : पंचगंगा धोका पातळीच्या खाली

Aug 1, 2024 - 10:53
 0
Kolhapur : पंचगंगा धोका पातळीच्या खाली

कोल्हापूर : सहा दिवसांपासून धोका पातळीवरून वाहणारी पंचगंगा बुधवारी दुपारी 4 वाजता धोका पातळीच्या खाली आली आणि धास्तावलेल्या पूरग्रस्तांनी सुटकेचा निःश्वास टाकला. महापुराचा विळखा सैल होत असून शहरासह जिल्ह्यातील नागरी वस्तीत शिरलेले पुराचे पाणी ओसरत आहे. शहरात अद्याप जामदार क्लबजवळ पुराचे पाणी आहे. बुधवारी रत्नागिरी - पन्हाळा मार्गावरील पाणी ओसरल्याने हा मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे.

शहरात पुराचे पाणी ओसरून जामदार क्लबपर्यंत आले आहे. गेल्या 24 तासांत शहरात 40 मि. मी. पाऊस झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने गुरुवार (दि. 1), शुक्रवार (दि. 2), शनिवार (दि. 3) हे तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंचगंगा नदी धोका पातळीच्या खाली आल्याने जिल्ह्यातील प्रमुख मार्ग वाहतुकीस खुले होत आहेत. आंबेवाडी - चिखली मार्गावरील पाणी बुधवारी पूर्णपणे ओसरले होते. चिखली-वरणगे पाडळी पुलावरील पाणीदेखील कमी झाले. याशिवाय कोल्हापूर - पन्हाळा मार्गावरील पाणी ओसरले. आंबेवाडीतून वडणगेकडे जाणारा मार्गही पूर्ण खुला झाला. उत्तूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली असून 9 राज्य मार्ग व 44 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 52 मार्ग अद्याप बंद आहेत. 24 मार्गावरील एसटी सेवादेखील पूर्णतः बंद आहे. हळूहळू मार्ग खुले होत आहेत. बुधवारी रात्री 8 वाजता पंचगंगा 42.9 फुटांवर होती.

17 गावांमध्ये अतिवृष्टी

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सात तालुक्यांतील 17 गावांमध्ये अतिवृष्टी झाली. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव 66.8, मलकापूर 116.3, आंबा 110.5, राधानगरी तालुक्यातील सरवडे 68.3, राधानगरी 68.3, आवळी 72.3, कसबा वाळवे 72.3. कागल तालुक्यातील बिद्री 71.8, भुदरगड तालुक्यातील गारगोटी 73, कूर 71.8, कडगाव 112, कराडवाडी 73, आजरा तालुक्यातील गवसे 73, आजरा 73, चंदगड तालुक्यातील हेरे 90.5, नारंगवाडी 90.5, चंदगड 90.5 या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात सरासरी 44 मि.मी. पाऊस झाला.

धरणातून विसर्ग वाढविला

तुळशी धरणातून सकाळी 10 वाजता 1500 क्यूसेक सुरू असलेल्या विसर्गात वाढ करून तो 2000 क्यूसेक करण्यात आला. दूधगंगा धरणातून एकूण विसर्ग 9100 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून एकूण 11585 विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 01-08-2024

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow