रत्नागिरीत लोकनेते शामराव पेजे यांचे स्मारक उभारणार

Aug 1, 2024 - 10:39
 0
रत्नागिरीत लोकनेते शामराव पेजे यांचे स्मारक उभारणार

मुंबई : कोकणच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असलेले कोकणपुत्र, लोकनेते स्वर्गीय शामराव पेजे यांचे स्मारक रत्नागिरीतील कुवारबाव येथे उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

स्मारकासाठी जमिनी उपलब्ध करण्यासह आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. लोकनेते शामराव पेजे यांचे स्मारक भव्य आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे झाले पाहिजे, त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठाच्या उभारणीलाही बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा घेण्यासाठी आज श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्यव्यवसाय विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, गृह (परिवहन व बंदरे) विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) संजय दशपुत्रे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रत्नागिरीतील संबंधित संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत श्री. पवार म्हणाले की, लोकनेते स्वर्गीय शामराव पेजे यांचे स्मारक कुवारबाव येथे व्हावे, ही रत्नागिरीकरांची आणि राज्य शासनाची इच्छा आहे. त्यादृष्टीने स्मारकासाठी आवश्यक जागा संबंधित विभागाने तातडीने हस्तांतरित करावी, स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. स्मारकाचे काम दर्जेदार आणि लोकनेत्यास साजेसे असले पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. कोकणला लाभलेल्या सागरी किनाऱ्याचे महत्त्व लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठाची स्थापन करण्यास बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. हे सागरी विद्यापीठ मेर्वी (ता. रत्नागिरी) येथे समुद्रकिनारी उभारण्यात येणार आहे. विद्यापीठासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. रत्नागिरी येथे शासकीय विधी महाविद्यालय उभारण्यासह जिल्ह्यातील अन्य प्रकल्प आणि विकासकामांचा सविस्तर आढावाही बैठकीत घेण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 01-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow