Weather update : पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे.. कोल्हापूर, सांगलीला पाऊस झोडपणार; IMD कडून अलर्ट

Aug 2, 2024 - 12:07
 0
Weather update : पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे.. कोल्हापूर, सांगलीला पाऊस झोडपणार; IMD कडून अलर्ट

सांगली : राज्यातील विविध भागात पावसाचा जोर (Heavy Rain) कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, कोल्हापुरात आज आणि सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी, रविवारी पावसाचा रेड अलर्ट दिला.

त्यामुळे सांगलीसाठी (Sangli Rain) पुढील 48 तास महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्याच्या पाणी पातळीत वाढ आहे. कृष्णा-वारणा नद्यांचा संगम असलेल्या हरिपूर येथे नद्या पात्राबाहेर पडल्य आहेत. दुसरीकडे कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे सातत्याने धरणातून नदी पात्रात विसर्ग वाढवला जात आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यासाठी पुढील 48 तास अतिशय महत्त्वाचे आहेत. सांगलीत सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फूट आहे. कोयनेतून दुपारी दहा हजार क्युसेक्सचा विसर्ग वाढविल्याने व पावसाच्या इशाऱ्याने सांगलीत पाणी पातळी शनिवारी 41 ते 42 फूट जावू शकते.

सांगलीसाठी पुढील 48 तास का महत्त्वाचे?

हवामान खात्याने कोल्हापुरात आज व सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी, रविवारी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे सांगलीच्या पुराबाबत पुढील 48 तास महत्वाचे असणार आहेत. जर कोयना धरण क्षेत्रात पाऊस मुसळधार झाला तर धरणातील विसर्ग वाढवला जाऊ शकतो आणि यामुळेच चाळीस फुटावर असलेली कृष्णा नदीची पातळी धोकादायक पातळीकडे जाऊ शकते. यामुळेच पुढील काही दिवस सांगली साठी महत्त्वाचे असणार आहेत.

महापालिका प्रशासनाकडून खबरदारी

सखल भागातील नागरिकांनी, नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, यासाठी प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. सांगलीत संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता महापालिकेकडून पूर पट्ट्यात नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले जात आहे. महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत जागृती सुरू करण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना मनपा प्रशासनाकडून स्पीकरवरून दिल्या जात आहे.

पुढील 3 दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता

आजपासून पुढील 3 दिवस म्हणजे 4 ऑगस्टपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी वर्तवली आहे. 4 ऑगस्टपर्यंत राज्यात भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 02-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow