श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार होणार उत्साहात साजरा

Aug 3, 2024 - 12:38
 0
श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार होणार  उत्साहात साजरा

देवगड : कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्साहात साजरे केले जातात. तब्बल ७१ वर्षांनंतर यावर्षी श्रावण सोमवारीच श्रावण मासाला सुरुवात होणार आहे. तसेच यावर्षी १८ वर्षानंतर पाच सोमवारचा दुग्धशर्करा योग जुळून आला असल्याची माहिती कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून देण्यात आली. हा योग साधत श्रीक्षेत्र कुणकेश्वर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविकांची श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी होणार असून, श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टने भाविकांच्या सोयीसाठी दर्शन मंडप तसेच दर्शन रांगांची व्यवस्था केलेली आहे. भाविकांना थेट गाभाऱ्यात जाऊन श्रींचे दर्शन घेता येणार आहे. मात्र, अभिषेक व तत्सम धार्मिक विधी सोमवारी गाभाऱ्याच्या बाहेर होतील.

यावर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार आले असून पहिल्या सोमवारी आ. नितेश राणे यांच्या हस्ते प्रथम पूजा होईल. दुसऱ्या श्रावणी सोमवारी विधान परिषद सदस्य आ. रवींद्र फाटक यांच्या हस्ते प्रथम पूजा होईल. तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी किशोर तावडे व जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या हस्ते प्रथम पूजा होईल. तसेच सोमवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्री देव कुणकेश्वराची पहाटे ५ वा. प्रथम पूजा केली जाईल. यानंतर भाविकांना दर्शन खुले होईल. भाविकांनी रांगेतून दर्शन घ्यावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्यावतीने करण्यात आले आहे. प्रत्येक सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे सेवा सादरीकरण मंदिरात होणार असून यामध्ये प्रामुख्याने संगीत भजने, दिंडी भजने व इतर सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरात पार पडतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:06 PM 03/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow