रत्नागिरी : मजूर संस्थेच्या नावाखाली 'बोगस' कामे

Aug 7, 2024 - 14:35
 0
रत्नागिरी : मजूर संस्थेच्या नावाखाली 'बोगस' कामे

रत्नागिरी : मजूर सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी शासनाने विना निविदा १० से ३० लोकांपर्यंतची कामे देण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु सध्या हा निर्णय वादात सापडला आहे. बहुतांश सर्वच संस्थाचालक व पदाधिकारी लाखोच्या महागड्या गाड्या घेऊनच जिल्ह्या परिषदेत कामासाठी येऊ लागले आहेत तसेच मजूरी फक्त कागदावरच दाखवले जात असून, परराज्यातील मजुरांमार्फत कामे केली जात आहेत. यामुळे 'बोगस' कामे थांबवण्याचे आव्हान जि.प. समोर निर्माण झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडून गावागावांत विकासकामे केली जातात. ही कामे राज्यातील मजूर संस्थेला देण्याचा निर्णय शासनाने काही महिन्यांपूर्वी घेतला, त्यानुसार विना निविदा १० ते ३० लाखांपर्यंत कामे देण्यात येत आहेत. तसेच वर्षभरात तब्बल १ कोटी रुपयांची कामे संस्थेला देण्याची तरतूद आहे. मात्र, याबाबत आढावा घेतला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे मजूर संस्थांची योजना ही भ्रष्टाचाराचे मुख्य स्त्रोत बनल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

कोणतीही पात्रता नसताना महत्त्वाची बांधकामाच्या निविदा बांधकाम विभागाचे अधिकारी मजूर संस्थांना देत आहेत. बांधकाम विभागाकडून एखादे काम जर विना अट हवे असेल तर मजूर संस्था हा सध्या सोयीचा मार्ग झाला आहे. यातूनच टक्केवारीचा खेळ सुरू झाला आहे

जिल्ह्यात जेवढ्या मजूर संस्था आहेत त्यापैकी जवळपास ८० टक्के या बोगस असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या संस्थेतील मजूर सदस्य हे फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. तेथील एकही सदस्य कोणतेही काम स्वत: करत नाही आणि करु शकत नाही. कारण मजूर संस्थेचे चेअरमन व सदस्य हेच मुळात लाखोपती य करोडपती आहेत हे वारंवार दिसून आले आहे. जिल्हा परिषदेत येताना हे चेअरमन व सदस्य लाखो रुपयांच्या महागडया गावांमधून येताना दिसतात. सध्या जिल्ह्यात जी कामे सुरू आहेत हे परजिल्ह्यातील परराज्यातील कामगार आणून केले जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

शासनाने बांधकाम करायचे झाल्यास पात्र ठेकेदारांना अनुभव लागतो, स्वतःची यंत्रसामग्री लागते, अद्यावत स्टाफ लागतो पण, मजूर संस्थांना अशा प्रकारची कोणतीही अट लागत नाही जिल्ह्यातील सर्व मजूर संस्थांची सध्या सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. मजूर संस्थांमधील मजूर प्रत्यक्षात काम करत नाहीत. पण ती कामे कोणामार्फत केली जातात? सध्या मजूर संस्थांमध्ये मजूर सदस्यांचे वार्षिक उत्पन्न कोण आहे? प्रत्यक्ष जागेवर काम करतेवेळीचे छायाचित्र उपलब्ध आहे का? याची चौकशी करणे गरजेचे आहे. एकंदरीत जिल्ह्यातील मजूर संस्थांच्या नावाखाली बोगस कामांचा सुळसुळाट सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. यामुळे ही बनावट कामे थांबवण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

कोकण आयुक्त कार्यालयात तक्रार...
मयुराच्या हाताला काम मिळावे, हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. परंतु संस्थेचे मजूर काम करत नसून बोगस कामगार विशेषतः परजिल्हा व परराज्यातील काम करत आहेत. यामुळे स्थानिकांना काम मिळत नाही. यामुळे सर्व मजूर संस्थांची चौकशी करावी, अशी मागणी आपण कोकण आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहिती संगमेश्वर पं.स.चे माजी उपसभापती अजित उर्फ छोटया गवाणकर यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 07/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow