जनतेला रस्त्यावर उतरायला लावू नका; लांजा शहर समन्वय समितीचा नगरपंचायत प्रशासनाला इशारा

Aug 31, 2024 - 11:20
Aug 31, 2024 - 12:24
 0
जनतेला रस्त्यावर उतरायला लावू नका; लांजा शहर समन्वय समितीचा नगरपंचायत प्रशासनाला इशारा

लांजा : लांजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अर्धवट, दिरंगाईने आणि दुर्लक्षित होत असलेल्या विकासकांमाबाबत लांजा नगरपंचायतीकडून कोणतीच पूर्तता न केल्याने गुरुवारी लांजा समन्वय समितीने लांजा नगरपंचायतीवर धडक दिली. अर्धवट विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावा. वारंवार समज देऊनही त्याकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जनतेला रस्त्यावर उतरायला लावू नका, असा सक्त इशारा लांजा शहर समन्वय समितीने लांजा नगरपंचायत प्रशासनाला दिला. 

लांजा शहरातील प्रलंबित आणि दुर्लक्षित विकास कामांबाबत लांजा समन्वय समितीच्या वतीने जुलै महिन्यामध्ये निवेदन देण्यात्त आले होते. मात्र, शहरातील विकासकामे मार्गी लावण्यात आली नाहीत. त्याविरोधात गुरुवारी लांजा मुख्याधिकारी यांना नागरिकांनी जाब विचारला. शहरातील रस्ते, गटारे, आरोग्य, लाईट आदी विषयांवर नागरिकांनी विविध प्रश्नांची सरबत्ती केली. काही कामे सुरू असल्याचे मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी सांगितले. नागरिकांच्या प्रश्नांबाबत दिरंगाई नको, अशा सक्त सूचना समन्वय समितीने केल्या.

शहरातील मंदिर परिसर स्वच्छता, रस्त्यांची झालेली दुरवस्था, पॅकबंद गटारे साफसफाई, पावसात तुंबणारी गटारे, त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसून पाणी रस्त्यांवर येणे, फिरते शौचालये, बंद पथदीप, सुलभ सौचालय, रस्त्यांचे डांबरीकरण व कॉक्रिटीकरण आदी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शहारातील रस्ते मशिननेच झाले पाहिजेत यासह शहरात स्ट्रीट लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. भटकी जनावरे, कुत्रे यांचा बंदोबस्त करावा. शहरातील मोडकळीस आलेल्या पुलांची पाहणी करून दुरुस्त करावेत, अशी मागणी करण्यात आली.

याप्रसंगी लांजा समन्वय समितीचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, महंमद रखंगी, जयवंत शेट्ये, विजय कुरूप, चंद्रशेखर स्वामी, प्रकाश लांजेकर, सुधाकर कांबळे, महेश सप्रे, अॅड. निरंजन देशमुख, अॅड. अभिजित जेधे, मंदार भिंगार्डे यांसह समनव्य समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

शहरातील रस्ते, गटारे प्रत्यक्ष पाहणी व परीक्षण करण्यात येईल. काही कामे सुरू आहेत, तर काही कामे लवकर पूर्ण करण्यात येतील. हर्षला राणे नगराध्यक्षा, लांजा

ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाका
पावसाळ्यापूर्वी तयार करण्यात आलेले रस्ते दोन महिन्यांतच खराब झाले आहेत. संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाका. शहराची भौगोलिक माहिती किंवा प्रत्यक्ष पाहणी करून परिसराची जाण असणाऱ्या अभियंत्यालाच शहरातील रस्त्याची कामे द्यावीत, अशी मागणी समन्वय समितीने केली.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 31/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow