प्रसूतीनंतरचे स्तनपान हे बाळाचे पहिले लसीकरण : जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. पल्लवी पगडाल
रत्नागिरी : बाळाचे आरोग्य सुधारावे व महिलांना कुठेहीं व कधीही स्तनपान देण्याच्या अधिकारांना प्रोत्साहन मिळाव, याकरिता राष्ट्रीय माता-बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत व युनिसेफ या बाळासाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेमार्फत दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान शून्य मातामृत्यू व शून्य बालमृत्यू या संकल्पनेतून सर्व आरोग्य संस्थेमध्ये स्तनपान जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे. आईचे दूध बाळासाठी अमृतच असहे. प्रसूतीनंतर आईने बाळाला दिलेले स्तनपान म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण असे म्हणायला हरकत नाही, असे सप्ताहानिमित्त जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. पल्लवी पगडाल यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, दूध बाळाला अर्ध्या ते एक तासाच्या आत दिले पाहिजे, अशा चीक दुधातून मिळणाऱ्या घटकांमुळे बाळाला रोगप्रतिकारशक्ती मिळते. पुढे एक वर्षापर्यंत बाळाला अनेक आजारापासून संरक्षण मिळते. जन्मापासून ते ६ महिन्यापर्यंत बाळाला निव्वळ स्तनपान दिले पाहिजे कारण ६ महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान पुरेशा प्रमाणात दिल्याने बाहेरच्या आहाराची गरज नसते. ६ महिन्यानंतर बाळाला आईच्या दुधासोबतच बाहेरचा हलका आहार सुरु केला पाहिजे. कारण या सवयीने १ वर्षांपर्यंत बाळ पूर्ण जेवण करू शकेल व पुढे कुपोषणाची समस्या निर्माण होणार नाही, असे डॉ. पगडाल यांनी सांगितले.
आजकालच्या सुशिक्षित व उच्चभ्रू मातांच्या मनात नवजात शिशूला स्तनपान देताना खूप गैरसमज असतात. पण स्तनपान दिल्याने बाळाला तर फायदा होतोच पण स्तनदा मातेला देखील खूप फायदे होतात. बाळाला रोगप्रतिकारक शक्ती मिळते, आई व बाळ बांधिलकी निर्माण होऊन बाळाची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होते. स्तनपान दिल्याने नैसर्गिकरित्या पाळणा लांबतो. स्तनपानामुळे बांधा सुडौल होतो. स्तनाचा कर्करोग होत नाही. त्याचबरोबर गर्भाशय, अंडाशय व इतर कर्करोगाचा धोका कमी होतो. बाळंतपणानंतर लगेचच स्तनपान सुरु केल्याने नाळ लवकर पडते. गर्भाशय लवकर आकुंचन पावते व बाळंतपणानंतर गर्भाशय पूर्वस्थितीत लवकर येण्यास स्तनपानामुळे मदत होते, असेही डॉ. पगडाल म्हणाल्या.
स्तनपान जनजागृती सप्ताहनिमित्त जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये येथे हिरकणी कक्षाची स्थापना केली आहे. सर्व हिरकणी कक्षामध्ये मातांना आपल्या बाळासाठी निःसंकोचपणे स्तनपान करता येईल तसेच आशा व आरोग्यसेविकेकडून त्याबाबत आरोग्य शिक्षण मिळेल अशी सुविधा उपलब्ध केली आहे. अनेक शासकीय कार्यालये, विविध खासगी संस्था, सरकारी दवाखाने, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, मॉल यामध्ये काम करणाऱ्या व कामानिमित्त आलेल्या स्तनदा मातांना आपल्या बाळांना स्तनपान देण्यासाठी हिरकणी कक्षामध्ये सुरक्षित जागा उपलब्ध असते. त्यामुळे याचा उपयोग सर्व स्तनदा मातांनी केला पाहिजे.
बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व पोषक घटक स्तनदा मातेच्या दुधात असतात. त्यामुळे पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाळाला निव्वळ स्तनपान दिले पाहिजे तसेच त्यानंतर स्तनपान बंद न करता त्यासोबत पूरक आहार पण दिला पाहिजे, असे आवाहन डॉ. पल्लवी पगडाल यांनी केले आहे.
.. तर भविष्यात आजारपण
ज्या बाळांना जन्मापासून व्यवस्थित स्तनपान मिळत नाही अशा बाळांचे स्तनपानाअभावी कुपोषण होते. परिणामी अशा बाळांना भविष्यात आजारपण व बालमृत्यूलाही सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी स्तनपान जनजागृती सप्ताहद्वारे स्तनपानाचे महत्व व फायदे सांगून जनजागृती केली जाते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:00 PM 07/Aug/2024
What's Your Reaction?