मॉन्सून तळकोकणात ४ जूनपर्यंत येण्याचा अंदाज

Jun 1, 2024 - 17:19
 0
मॉन्सून तळकोकणात ४ जूनपर्यंत येण्याचा अंदाज

पुणे : प्रचंड उन्हाच्या कडाक्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात नागरिकांचे हाल होत असून, बहुतांश शहरांतील कमाल तापमान चाळीशीपार नोंदवले जात आहे. काही भागात तर तापमान ४५ अंशावर गेले आहे. त्यामुळे चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणी नागरिक हैराण झाले आहेत.

पण आता लवकरच मॉन्सून येणार असून, तळकोकणात तो ४ जूनपर्यंत येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

यंदा देशामध्ये १०६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज देण्यात आला आहे. तसेच मॉन्सून लवकर दाखल होत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या विदर्भ, मराठवाड्यात सूर्यनारायण चांगलाच कोपला आहे. त्या ठिकाणी अक्षरश: आग ओकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा येत आहेत. त्यामुळे मॉन्सून दाखल झाल्यानंतर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. येत्या ४ जून रोजी मॉन्सून तळकोकणात दाखल होईल, असा अंदाज देण्यात आलेला आहे.

'रेमल' या चक्रीवादळाच्यामुळे बंगालच्या उपसागरावरील मॉन्सून सक्रिय झालेला आहे. त्यामुळे मॉन्सूनाला कुठेही अडथळा येणार नाही. मॉन्सूनची केरळच्या पुढील वाटचाल चांगल्यारितीने होणार आहे. मॉन्सूनने यावर्षी अकरा दिवस अगोदरच पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मजल मारलेली आहे. मॉन्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा रविवारपासून (दि.२) अधिक बळकट होतील. परिणामी मॉन्सूनची वेग चांगला राहील, असा अंदाज देण्यात आला आहे.

जून महिना सुरू झाल्याने या महिन्यात जो पाऊस पडेल, तो मॉन्सूनचा समजला जाईल. त्याची नोंद होणार आहे. त्यामुळे जून ते सप्टेंबर दरम्यान जो पाऊस पडेल, त्यात आजपासून होणाऱ्या पावसाचा समावेश होईल. राज्यात काही भागात मॉन्सून पाेचलेला नसला तरी देखील तो पाऊस मॉन्सूनचा समजला जाईल. सध्या पं. बंगालच्या काही भागात आणि केरळच्या पुढे जाण्यासाठी मॉन्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळे गोव्यामध्ये ३ जून रोजी, तळकोकणात ४ जून रोजी तर पुण्यात ६ जून रोजी दाखल होऊ शकेल. - डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त हवामानशास्त्रज्ञ, आयएमडी, पुणे
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:47 01-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow