"नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचं मूर्तिमंत रुप" : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aug 9, 2024 - 11:00
 0
"नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचं मूर्तिमंत रुप" : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ट्रॅक अँड फील्ड खेळाडू ठरला आहे.

नीरजने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं. यंदा पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. याशिवाय नदीमने ऑलिम्पिकमध्ये ९२.९७ मीटर भालाफेक करून नवा विक्रमही केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच नीरजचा एक फोटो देखील शेअर केला आहे. "नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचं मूर्तिमंत रुप! त्याने वेळोवेळी आपली चमक दाखवली आहे. आणखी एक ऑलिम्पिक यश मिळवून पुनरागमन केल्याने भारत आनंदी आहे. रौप्यपदक जिंकल्याबद्दल त्याचं अभिनंदन. तो असंख्य खेळाडूंना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करण्यासाठी सतत प्रेरणा देत राहील" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

नीरज चोप्राचे सहा पैकी पाच प्रयत्न फाऊल होते. फक्त दुसरा थ्रो व्हॅलिड होता, ज्यामध्ये त्याने ८९.४५ मीटर अंतरावर भाला फेकला. हा त्याचा या सेशनमधील सर्वोत्तम थ्रो ठरला. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करून सुवर्ण पदक जिंकलं होतं. पण यावेळी त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

पाकिस्तानने ३२ वर्षांनंतर जिंकलं ऑलिम्पिक पदक

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ३२ वर्षांनंतर आपल्या देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकलं आहे. १९९२ च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानने शेवटचं पदक जिंकलं होतं. नदीमने दुसऱ्या थ्रोमध्ये ९२.९७ मीटर भालाफेक केली. यासह त्याने ऑलिम्पिक विक्रमही केला. त्याचा सहावा आणि शेवटचा फेक ९१.७९ मीटर होता. यावेळी कांस्य पदक ग्रेनाडाच्या एंडरसन पीटर्सने पटकावलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 09-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow