रत्नागिरी : जिल्ह्यातील बागायतदारांना आंबा व काजू विमा परताव्याची प्रतीक्षा

Aug 10, 2024 - 12:28
 0
रत्नागिरी : जिल्ह्यातील बागायतदारांना आंबा व काजू विमा परताव्याची प्रतीक्षा

त्नागिरी : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा कालावधी संपून ६७ दिवस लोटले तरी अद्याप विमा कंपन्यांनी परतावा जाहीर केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३६,९०९ बागायतदारांना परताव्याची प्रतीक्षा आहे.

विमा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून ४५ दिवसात बागायतदारांना विमा परतावा रक्कम प्राप्त होणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप विमा कंपन्यांकडून परतावाच जाहीर केलेला नसल्याची बाब पुढे आली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केंद्र शासनाने जाहीर केली आहे. जिल्ह्यातील आंबा, काजू पिकाचा समावेश फळपीक विमा योजनेअंतर्गत करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे.

जिल्ह्यातील ३०,०६८ आंबा बागायतदार तर ६,८४१ काजू बागायतदार विमा योजनेत सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांनी एकूण २० हजार ७८६.१६ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे. २७ कोटी ३९ लाख ९ हजार १५ एकूण प्रस्तावित विमा रक्कम आहे.

राज्य शासन हप्त्याची रक्कम ५३ लाख ३४ हजार ४६ तर केंद्र शासन हप्त्याची रक्कम ३१ लाख ३५ हजार ६४, शेतकरी हप्त्याची रक्कम २४ लाख ११ हजार ५० मिळून एकूण १० कोटी ८८ लाख १ हजार ६१ रुपये विमा हप्ता आहे.

हप्त्याची रक्कम
५३,३४,०४६ राज्य शासन
३१,३५,०६४ केंद्र शासन
२४,११,०५० शेतकरी हप्ता
१०,८८,०१,०६१ एकूण विमा हप्ता
२७,३९,०९,०१५ एकूण प्रस्तावित विमा रक्कम

वर्ष आंबा बागायतदार काजू बागायतदार एकूण शेतकरी
२०२१-२२ २२,३५७ ४,२२३ २६,५८०
२०२२-२३ २६,४१९ ५,८७१ ३२,२९०
२०२३-२४ ३०,०६८ ६,८४१ ३६,९०९

पर्जन्यमापक यंत्र निरूपयोगी
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १५५१ गावे व ८४५ ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यात ८२ महसूल मंडळे असून, महसूल मंडळांतर्गत पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत.मात्र, ही यंत्रे डोंगरखोऱ्यातील, वाडीवस्तीलगतचे तापमान नोंदविण्यात दुर्बल ठरत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या तीन वर्षांपासून शासनाचे ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित तापमानमापक यंत्र बसविण्याचे घोंगडे अद्याप भिजत आहे.

दरवर्षी हवामानातील बदलाचा परिणाम पिकाच्या उत्पादकतेवर होतो. बागायतदार मोठ्या संख्येने विमा योजनेत सहभागी होतात. मात्र, महसूल मंडळातील ट्रिगर अॅक्टिव्हेट होत नसल्याने प्रत्यक्ष नुकसान ग्राह्य धरले जात नाही, त्यामुळे अपेक्षित परतावा मिळत नाही.- राजन कदम, बागायतदार


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 10-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow