रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांची पदे वाचणार आणि वाढणारही?

Aug 10, 2024 - 13:37
Aug 10, 2024 - 13:48
 0
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांची पदे वाचणार आणि वाढणारही?

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये १५० विद्यार्थी पटाऐवजी १०० विद्यार्थी संख्येला मुख्याध्यापक पद ग्राह्य धरण्याचा निर्णय मुंबईतील बैठकीत शिक्षणमंत्री यांनी मंगळवारी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या निर्णयामुळे जिल्ह्यात अनेक मुख्याध्यापकांची पदे वाचणार आहेत आणि वाढणारही आहेत

यापूर्वी इ. १ ली ते ८ वीपर्यंत १०० पटसंख्येला मुख्याध्यापक पद मिळत होते. तसेच १ ली ते ५ वीपर्यंत १५० पटसंख्येला ५ उपशिक्षक आणि १ मुख्याध्यापक मंजूर होत होते. मात्र, १५ मार्च २०२४ ला संच मान्यतेबाबत नवा आदेश काढण्यात आला. त्यानुसार १५० पटाला मुख्याध्यापक पद देण्यात आले. त्यामुळे मुख्याध्यापकांवर टांगती तलवार आली.

अनेक पदे कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. अनेक शाळांना हा निर्णय मारक ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयाला अनेक शिक्षक संघटनांनी सातत्याने विरोध केला.

मंगळवारी मुंबईत बैठक झाली. त्या बैठकीतही मुख्याध्यापक पदाचा विषय समोर आला. त्यानंतर १५ मार्च २०२४ च्या संच मान्यता शासन निर्णयात सुधारणा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीतील निर्णयानुसार मुख्याध्यापक पदासाठी १५० पटसंख्याऐवजी १०० पटसंख्या ग्राह्य धरले जाणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास अनेकांचे मुख्याध्यापक पद वाचणार आहे. तसेच नव्याने मुख्याध्यापकांची पदे वाढणार आहेत. मात्र, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला शुक्रवारपर्यंत याबाबत कोणताही आदेश आला नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे आदेश आल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. शासनाने १५० ऐवजी १०० पटसंख्येला १ मुख्याध्यापक देण्याबाबतच्या निर्णयाचे स्वागतच आहे. परंतु, त्याचबरोबर १५ मार्च २०२४ संच मान्यता शासन आदेशात बदल करावा, अशी मागणी शिक्षक सेना रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांनी केली.

जिल्ह्यात फक्त ४९ पदे
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २५०० शाळा आहेत. मात्र, पटसंख्येचा विचार केला तर १५० पेक्षा जास्त पटसंख्येच्या शाळा या फारच कमी आहेत. फक्त ४९ शाळा आहेत. यामुळे फक्त ४९ पदे मंजूर आहेत.

१५ मार्चचा संच मान्यतेचा आदेश पूर्णपणे रद्द करावा
१५ मार्च २०२४ संच मान्यता शासन आदेश पूर्ण रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता करण्यात यावी. इ. १ ली ते ५ वी शाळांमध्ये पूर्वीप्रमाणे ६१ विद्यार्थ्यांना ३रे, ९१ पटासाठी ४ थे, १२१ पटाला ५ वे, १५१ पटाला ६ वे पद मंजूर होणे आवश्यक आहे. तसेच ज्या ठिकाणी ६० पेक्षा कमी पट आहे; परंतु चार इयत्ता आहेत तेथे पूर्वीप्रमाणे कोणत्याही अटी शिवाय दोन शिक्षक पदे मंजूर ठेवावीत, अशी मागणी काही शिक्षक संघटनांनी यापूर्वी शासनाकडे केली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 10/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow