कॅनिंगच्या दरात घसरण...

Jun 3, 2024 - 11:29
Jun 3, 2024 - 11:40
 0
कॅनिंगच्या दरात घसरण...

राजापूर : हापूस पेटीच्या घसरलेल्या दरामुळे बाजारपेठेमध्ये आंब्याची पेटी पाठविणे बागायतदारांना आर्थिकदृष्ट्या परवडेनासे झालेले असताना कॅनिंगच्या चांगल्या दराने हात दिला होता. मॉन्सूनच्या आगमनाचे संकेत मिळत असताना कॅनिंगच्या दरामध्येही घसरण झाली आहे. ३८ वरून कॅनिंगचा दर ३५ रुपयांवर प्रतिकिलोवर आला आहे. घसरलेला दर आणि संपलेला मे महिना अशी स्थिती असलो तरी, हंगामाच्या अंतिम टप्प्यातील उरलासुरलेला सरासरी पाच-दहा टक्के हापूस आंबा कॅनिंगला येत आहे.

प्रतिकूल वातावरणामुळे आधीच कमी उत्पादन, त्यामध्ये कमी दराची पडलेली भर यामुळे यावर्षीच्या हापूस आंब्याच्या हंगामामध्ये बागायतदारांसह व्यापाऱ्यांचे पुरते कंबरडे मोडून गेले. अंतिम टप्प्यामध्ये तर हापूस आंब्याच्या पेटीच्या दरामध्ये घसरण झाल्याने बागायतदारांनी आंब्याची पेटी मार्केटला पाठवण्याऐवजो कॅनिंगवर आंब्याची विक्री करण्याला अधिक पसंती दिल्याचे चित्र दिसले. त्यामध्ये कॅनिंगचा प्रतिकिलोचा दरही चांगला होता. त्यामुळे कॅनिंगच्या खरेदी-विक्रीमध्ये चांगली उलाढाल झाली. मे महिना संपला असला तरी उशिरा मोहोर येऊन उशिरा तयार झालेला सुमारे पाच ते दहा टक्के आंबा अद्यापही बागांमध्ये शिल्लक आहे. हा आंबा कॅनिंगला देण्यावर बागायतदारांचा भर आहे. गेल्या आठवडाभराच्या कालावधीत आंबा कॅनिंगच्या दरामध्ये घसरण झाली आहे.

मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये हापूसच्या कॅनिंगचा ३८ रुपये प्रतिकिलो दर होता. घाऊक विक्री झाल्यास त्यामध्ये दोन-तीन रुपयांची वाढ होत होती; मात्र पावसाळा जवळ येऊ लागला आहे. त्याप्रमाणे कॅनिंगच्या दरामध्ये घसरण झाली आहे. त्यामध्ये ३८ रुपयांवरून कॅनिंगचा दर ३५ रुपयांवर आला आहे.

आंब्याची पेटी बाजारपेठेमध्ये भरण्यापासून पाठवण्यापर्यंत येणारा खर्च आणि मिळणारा पेटीचा दर यामध्ये कमालीची तफावत आढळते. अशा स्थितीत आंबापेटी पाठवणे डोईजड होते; मात्र कॅनिंगच्या चांगल्या दराची साथ मिळाली होती; मात्र तोही अंतिम टप्प्यामध्ये घसरला आहे. झाडावर शिल्लक असलेला आंबा वाया घालवण्यापेक्षा ना नफा ना तोटा या तत्त्वाप्रमाणे शिल्लक राहिलेला हापूस आहे त्या दराने कॅनिंगला देण्यावर भर दिला आहे. राजेश पाटील, आंबा बागायतदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 03/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow