तिघांचं सरकार असताना फक्त मीच टार्गेट का? फडणवीसांचे जरांगेंना प्रत्युत्तर

Aug 13, 2024 - 11:24
 0
तिघांचं सरकार असताना फक्त मीच टार्गेट का? फडणवीसांचे जरांगेंना प्रत्युत्तर

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून तापलेलं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मनोज जरांगे हे ओबीसीतून आरक्षण घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. दुसरीकडे या मागणीला ओबीसी नेत्याकडून कडाडून विरोध केला जातोय. दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील हे सातत्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना यावर भाष्य केलं आहे.

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गेल्या कित्येक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलन काळात मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने टार्गेट केलं. अनेकदा जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला होता. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विरोधात कट कारस्थान रचल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला होता. आता मुंबई तकशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"सरकार आमच्या तिघांचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मी आणि अजित पवार आम्ही दोघं उपमुख्यमंत्री आहे. पण फक्त मलाच मनोज जरांगे टार्गेट करतात. मी मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टात टिकवलं, सर्वोच्च न्यायालयातही टिकवलं होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आरक्षण कोर्टात टिकलं नाही. त्यांनी पुढे त्यासाठी काही प्रयत्नही केले नाहीत. शरद पवार चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी कधीही आरक्षण दिलं नाही. १९८२ मध्ये अण्णासाहेब पाटील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगितलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी आत्महत्या करेन, त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. १९८२ पासून मराठा आरक्षणाचा लढा सुरु झाला. तीनवेळा शरद पवार मुख्यमंत्री झाले, सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादीचं सलग राज्य होतं. तरीही मराठा आरक्षण दिलं नाही. आधी मी दिलं त्यानंतर एकनाथ शिंदेंनी आरक्षण दिलं." असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

तिघांचं सरकार असताना फक्त मला टार्गेट करतात - देवेंद्र फडणवीस

"मी मुख्यमंत्री असताना माझ्याच कार्यकाळात अण्णासाहेब पाटील महामंडळ आम्ही रिव्हावाईव्ह केलं. सारथी योजना सुरु केली. हॉस्टेलची सुविधा सुरु केली. हे सगळे निर्णय मी मुख्यमंत्री असताना झाले. त्यामुळे तुम्ही प्रश्न मला नाही तर मनोज जरांगेंना विचारा किंवा जवळच्या लोकांना विचारा की हे सगळं असताना ज्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही, मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकताच नाही असं सांगितलं त्यांच्यावर ते एकही शब्द बोलत नाहीत. तिघांचं सरकार असताना फक्त मला टार्गेट करतात याचा अर्थ काय? या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे." असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 13-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow