Ladki Bahin Yojana : महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नवी माहिती

Aug 14, 2024 - 10:05
 0
Ladki Bahin Yojana : महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नवी माहिती

मुंबई : रक्षाबंधनाच्या आधी म्हणजे 17 ऑगस्टला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojana) पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी फक्त 3 दिवस उरले आहेत.

एकाच वेळी महिलांच्या खात्यात 3 हप्त्यांचे म्हणजे एकूण 4 हजार 500 रुपये जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एकाचवेळी तीन महिन्यांचे पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

योजनेसाठी 33 हजार कोटी आर्थिक तरतूद

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना चालू होऊन एक महिनाही झालेला नाही. राज्यात 1 कोटी 40 लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शासन-प्रशासनाच्या मेहनतीमुळं हे शक्य झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी शासन स्तरावर दहा महिन्यांपासून काम सुरू होते. या योजनेसाठी 33 हजार कोटी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही यापुढेही कायम सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातील विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू ठेवण्यात येतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

बहिणींच्या हाताचे हे चटके कमी करण्यासाठीच योजना आणली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेचा संदर्भ दिला. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर’ जळगावच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या बहिणाबाईंचं हे काव्य आहे. संपूर्ण जगणे, आयुष्य बहिणाबाईंनी या दोन ओळीतून मांडलंय. संसाराचा गाडा हाकताना हाताला चटके हे लागतात. बहिणींच्या हाताचे हे चटके कमी करण्यासाठीच आम्ही राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 14-08-2024

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow