'आपले सरकार' सेवा संपुष्टात; राज्यातील २० हजार संगणक परिचालकांच्या भविष्यावर टांगती तलवार

Aug 14, 2024 - 10:46
Aug 14, 2024 - 14:53
 0
'आपले सरकार' सेवा संपुष्टात; राज्यातील २० हजार संगणक परिचालकांच्या भविष्यावर टांगती तलवार

रत्नागिरी : आपले सरकार केंद्रांच्या सेवा सरकारने अकस्मात संपुष्टात आणली आहे. त्यामुळे तुटपुंज्या मानधनावर या केंद्रांमध्ये गेली १२ वर्षे काम करणारे राज्यातील २० हजार संगणक परिचालक यांच्या भविष्यावर टांगती तलवार आहे. मुख्यमंत्र्यांनी यात तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी केली आहे.

संगणक परिचालक मुंबईत आंदोलन करण्याच्या विचारात असल्याचेही ते म्हणाले. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना आपले सरकार सेवा केंद्रांचे कार्य सुरळीत सुरू ठेवण्यास सांगितले आहे. सध्या परिचालकांनी विविध सरकारी विभागांच्या ऑनलाइन व ऑफलाईन सेवा देण्याचे काम सुरू ठेवून आपली सेवा कायम ठेवली आहे. सरकारी आदेशानुसार हे परिचालक १ जुलैपासून शासनाच्या सेवेत नसले तरी त्यांनी आपले हे काम सुरू ठेवले आहे. या सेवा देण्यासाठी राज्य सरकारने सीएससी-एसपीव्ही या एजन्सीची नियुक्ती केली होती. ही नियुक्ती ३० जूनला संपुष्टात आणली. त्यामुळे हे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

राज्य सरकारने २०११ मध्ये इ पंचायत ही प्रणाली सुरू केली आणि त्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व सेवा संगणकाच्या माध्यमातून तत्काळ देण्याची योजना आखली. या सेवांसाठी गाव पातळीवर सेवा केंद्रे स्थापन केली. राज्य सरकारने संगणक परिचालक म्हणून वीस हजार युवकांना नियुक्त केले. त्यांचे मासिक मानधन गेली १२ वर्षे केवळ ६,९३० रुपये एवढेच होते. हे मानधन ३००० रुपयांनी वाढवण्याचे आश्वासन यंदा मार्च महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही.

संगणक परिचालकांच्या समस्या सोडविण्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आयएएस अधिकारी अभय यावलकर यांची एक सदस्य समिती नेमली. या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची तसेच किमान वेतन देण्याची शिफारस केली होती. परंतु अंमलबजावणी झाली नसल्याचे मुंडे यांनी सांगितले.

या सेवा मिळतात
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून रेल्वे, बसचे आरक्षण, पॅनकार्ड, आधार कार्ड, तसेच विविध कृषी विषयक कागदपत्रांचा पुरवठा, पासपोर्ट, इलेक्ट्रिक, टेलिफोन बिल यांसारख्या बिलांचा भरणा यांसारखी कामे या केंद्रांच्या माध्यमातून केली जात होती. महाआयटीने आपले सरकार सेवा केंद्रांच्या सेवा चालविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नागरिकांसह, संगणक परिचालाकांचीही गैरसोय झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 14/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow