सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने, संकल्पाने २०४७ पर्यंत विकसित भारत नक्कीच बनवू शकतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aug 16, 2024 - 11:19
 0
सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने, संकल्पाने २०४७ पर्यंत विकसित भारत नक्कीच बनवू शकतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिली : संपूर्ण देश ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली.

यावेळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विकसित भारत करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधनाच्या सांगितले की, देशासाठी बलिदान देणाऱ्या अगणित स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस आहे. हा देश त्यांचा ऋणी आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या चिंतेत भर पडली आहे. नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी आपले कुटुंबीय गमावले; राष्ट्राचेही नुकसान झाले आहे. त्या सर्वांप्रती सहानुभूती व्यक्त करतो आणि खात्री देतो की, या संकटाच्या वेळी हे राष्ट्र त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

२०४७ पर्यंत विकसित भारत नक्कीच बनवू शकतो

आताच्या घडीला देशात १४० कोटी जनता आहे. जर आपण संकल्प केला आणि एकत्रितपणे वाटचाल केली तर, सर्व अडथळे पार करत २०४७ पर्यंत नक्कीच विकसित भारत बनवू शकतो, असा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी संबोधनाच्या सुरुवातीला केला. एक काळ असा होता जेव्हा लोक देशासाठी बलिदान द्यायला तयार होते. परंतु, आजचा काळ देशासाठी जगण्याचा आहे. देशासाठी बलिदान देण्याची तयारी देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते, तर देशासाठी जगण्याचा संकल्प भारताला समृद्ध करू शकतो. नेशन फर्स्टच्या संकल्पाने आम्ही प्रेरित आहोत. 'व्होकल फॉर लोकल'चा मंत्र आम्ही दिला. मला आनंद होत आहे की, व्होकल फॉर लोकल हा आर्थिक व्यवस्थेचा नवा मंत्र बनला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

दरम्यान, आमच्या सुधारणांची बांधिलकी चार दिवसांच्या टाळ्यांसाठी नाही, आमच्या सुधारणांची प्रक्रिया कोणत्याही जबरदस्तीमुळे घडून आलेली नाही, तर ती देशाला मजबूत करण्याची आहे. आम्ही राजकीय दबावामुळे कोणताही निर्णय घेत नाही, आम्ही राजकीय गणितांनुसार निर्णय घेत नाही. आमचा एकच संकल्प आहे की, प्रथम राष्ट्रहित, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 10 महत्त्वाच्या भाष्याविषयी जाणून घेऊ या...

1) कोरोना काळ कोणीही विसरू शकत नाही. आम्ही या काळात देशात सर्वाधिक वेगाने लसीकरण केले. भारतात अगोदर दहशतवादी येऊन अनेकांना मारून जायचे. आता देशाची सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करते. यामुळे देशातील युवकांची छाती अभिमानाने फुगते. देशातील लोकांचे मन आज गर्वाने आणि आत्मविश्वासाने भरलेले आहे.

2) दलित, पीडित, आदिवासी, झोपड्यांत राहणारे लोकच या सर्व सोईसुविधांवीना जगत होते. आम्ही प्रथामिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचाच फायदा या वंचित वर्गाला मिळाला आहे. व्होकल फॉर लोकलचा मंत्र दिला. व्होकल फॉर लोकल हा अर्थव्यवस्थेसाठी नवा मंत्र झाला आहे. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट हा प्रकल्प राबवला जातोय.अपारंपरिक उर्जेचा आम्ही संकल्प केला होता. अक्षय्य उर्जेसाठी जी-20 देशांनी जेवढे काम केले आहे, त्यापेक्षा अधिक काम भारताने केले आहे. भारताने ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी, ग्लोबल वार्णिंगच्या चितेंपासून दूर होण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

3) जेव्हा लाल किल्ल्यावरून स्वच्छ मिशनवर बोललं जातं, तेव्हा गावात स्वच्छतेविषयी चर्चा होते. मी समजतो की हे भारतातील चेतनेचे प्रतिक आहे. 3 कोटी परिवार असे आहेत ज्यांना नळाद्वारे पाणी मिळते. जल जीवन मिशन अंतर्गत एवढ्या कमी वेळेत 12 कोटी कुटुंबांना जल जीवन मिशनअंतर्गत नळाद्वारे पाणी दिले जात आहे. आज 15 कोटी कुटुंब या योजनेचे लाभार्थी आहेत.

4) आपण बदलाबाबत बोलत आहोत. आज देशात साधारण 3 लाख वेगवेगळ्या संस्था काम करत आहेत. पंचायत समिती, नगरपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, राज्य, जिल्हा, केंद्र पातळीवर वेगवेगळ्या 3 लाख संस्था आहेत. मी या सर्व संस्थांना आवाहन करतो की, वर्षात आपल्या स्तरावर फक्त दोन बदल करा. कोणताही विभाग असो फक्त एका वर्षात दोन बदल करा. जनतेचं आयुष्य सुकर करणारे हे बदल हवेत. हे बदल प्रत्यक्ष राबवावेत. हे बदल प्रत्यक्षात आल्यास एका वर्षात 25 चे 30 लाख बदल घडून येतील. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल घडतील तेव्हा सामान माणसाचा विश्वास वाढेल. त्याची शक्ती राष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास मदत होईल. त्यामुळेच या संस्थांनी बदल घडवण्यासाठी हिंमत करून पुढे यावे. सामान्य नागरिक जर पंचायत पातळीवर अडचणींचा सामना करत असेल तर त्या अडचणी दूर करायला हव्यात.

5) लोकांच्या जीवनात सरकारचा हस्तक्षेप कमी असावा. आम्ही दीड हजारपेक्षा अधिक कायदे रद्द केले आहेत. कायद्याच्या कचाट्यात लोक अडकू नयेत म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. कायदा करताना झालेल्या चुकांमुळे लोकांना छोट्या-छोट्या कारणांमुळे लोकांना तुरुंगात जायला लागायचे. आता ही परंपरा आम्ही नष्ट केली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे गुन्हेगारी कायदे होते. आता आम्ही न्यायसंहिता आणली आहे. आता दंड नव्हे तर न्यायाच्या भावनेला तयार केलं आहे.

6) अंतराळ क्षेत्रातही आपण आज अनेक बदल झाले आहेत. अंतराळ क्षेत्र हे आपल्या भविष्याशी जोडलेले आहे. अंतराळ क्षेत्र अनेक बंधनांनी जखडलेले होते. आता हेच बंधन मुक्त करण्यात आले आहे. अंतराळ क्षेत्रात अनेक स्टार्टअप्स येत आहेत. अंतराळ क्षेत्र हे भारताला शक्तिशाली बनवण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. आज प्रायव्हेट सॅटेलाईट्स, रॉकेट्स लॉन्च होत आहेत. नीती, धोरण योग्य असेल तर तसेच संपूर्ण समर्पणाची तयारी असेल तर योग्य परिणाम दिसून येतात, असे मोदी म्हणाले.

7) गेल्या दहा वर्षात दहा कोटी महिला वुमन सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आल्या आहेत. याचा आम्हाला गर्व आहे. सामान्य कुटुंबातील दहा कोटी महिला आर्थिक दृष्टीने स्वावलंबी होत आहेत. जेव्हा महिला आर्थिक दृष्टीने स्वावलंबी होतात तेव्हा कुंटुंबात ती महिला निर्णय प्रक्रियेचा भाग होते. ही एक मोठ्या सामाजिक बदलाची गॅरंटी आहे. भारतातील सीईओ जगभरात नावाजले जात आहे. दुसरीकडे एक कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत. आतापर्यंत 9 लाख कोटी रुपये महिला स्वयंसहायता बचत गटाला मिळाले आहेत. या मदतीमुळे महिला अनेक काम करत आहेत.

8) आज माझ्या देशातील तरुणाला हळूहळू चालायचं नाही. आज माझ्या देशातील तरुणाला थेट भरारी घ्यायची आहे. भारताचा हा सुवर्णकाळ आहे. त्यामुळे ही संधी आपल्याला गमवायची नाही. आपण याच संधीचा फायदा घेऊन स्वप्न आणि संकल्पाना घेऊन पुढे गेलो तर 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. एमएसएमई, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, कृषी अशा प्रत्येक क्षेत्रात नवी आणि आधुनिक यंत्रणा उभी राहात आहे. आपण आपल्या देशातील परिस्थितीनुसार पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक क्षेत्रात आधुनिकतेची गरज आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. आमच्या नव्या धोरणामुळे प्रत्येक क्षेत्रात या क्षेत्रांना तकद मिळत आहे.

9) आज बदलाचा आमचा मार्ग विकासाची ब्लू प्रिंट झाली आहे. हा बदल, विकास फक्त वादविदाचा, वैचारिक लोकांच्या चर्चेचा विषय नाही. राजकारण डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे करत नाहीयोत. आमच्या नजरेत राष्ट्र सर्वप्रथम आहे. आपला देश महान व्हावा हाच उद्देश समोर ठेवून आम्ही काम करतो. बँकिंग क्षेत्राचा आज मोठा विकास झाला. अगोदर या क्षेत्राचा विकास हो नव्हता. आपल्या बँका संकटात होत्या. बँकिंग क्षेत्र मजबूत करण्यासाठी आम्ही अनेक बदल केले. जेव्हा बँक मजूबत असते तेव्हा अर्थव्यवस्थाही मजबूत होते.

10) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात घराणेशाहीवरही प्रहार केले. राजकारणातील घराणेशाही नष्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कमीत कमी एक लाख तरुण-तरुणींनी पुढे यावे. यामुळे राजकारणातील घराणेशाहीला आळा बसेल. या तरुणांनी कोणत्याही पक्षात जावे. कोणतीही निवडणूक लढवावी, असेही मोदी यांनी आवाहन केले. तसेच मोदी यांनी देशात एक देश एक निवडणूक धोरण लागू करण्याची गरज असल्याचे आपल्या भाषणात म्हटले.

11) देशात 'स्टेटस को'ची स्थिती झाली होती. आम्हाला या मानसिकतेला तोडायचे होते. मात्र लोकांना विश्वास द्यायचा होता. आम्ही त्या दिशेने प्रयत्न केला. अनेक लोक म्हणायचे की येणाऱ्या पिढीसाठी आतापासून काम करण्याची गरज काय आहे. पण देशातील सामान्य नागरिकाला हे नको होते. सामान्य नागरिकाला बदल हवा होता. या सामान्य नागरिकाच्या भावनांचा कोणी आदर केला नाही. या भावनांची कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे हा माणूस बदलाची वाट पाहात होता. हीच जबाबदारी आम्हाला देण्यात आली. आम्ही अनेक बदल प्रत्यक्षात आणले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 16-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow