संगमेश्वर : बिबट्याची पिल्ले आईच्या कुशीत सोडण्यास वनविभागाला यश

Aug 22, 2024 - 11:03
Aug 22, 2024 - 12:03
 0
संगमेश्वर : बिबट्याची पिल्ले आईच्या कुशीत सोडण्यास वनविभागाला यश

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील चिखली येथे एका शेडमध्ये आढळलेली बिबट्याची पिल्ले वनविभागाच्या प्रयत्नानंतर पुन्हा एकदा आईच्या कुशीत सुखरूप सोडण्याच्या वनविभागाच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. चिखली येथे असणाऱ्या बंद शेडमध्ये निवृत्त कर्मचारी अशोक महादेव स्वामी व शशिकांत डिंगणकर रविवारी दुपारनंतर कामासाठी गेले असता त्यांना गुरगुरण्याचा आवाज येताच पाहिले असता त्यांना बिबट्याची तीन पिल्ले आढळली. याबाबत वनविभागाला कळविण्यात आले.

विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पिल्लांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामस्थांना सूचना दिल्या. कॅमेरे लावले जेणेकरून बिबट्याच्या हालचाली व पिल्लांची सुरक्षितता यावर लक्ष ठेवता येईल.

पहिल्या दिवशी बिबट्याने तीनपैकी दोन पिल्लांना जंगलात सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे कॅमेऱ्यातील हालचालींवरून स्पष्ट झाले. राहिलेले एक पिल्लू दुसऱ्या दिवशी सुरक्षित जंगलात हलविले. यानंतर वनविभागाने सुटकेचा निःश्वास घेतला.

विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई, सहायक वनसंरक्षक प्रियंका लगड, मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट, परिक्षेत्र वनअधिकारी किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुखचे वनपाल तौफिक मुल्ला, पालीचे न्हानू गावडे, वनरक्षक आकाश कडूकर, सहयोग कराडे, अरुण माळी, पोलिसपाटील, रूपेश कदम यांनी मोहीम फत्ते केली.

या परिसरात गवा, बिबटे असे अनेक जंगली प्राणी दिवसाही वावरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही पिल्ले दिसल्यानंतर येथील आसपासच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी शेंबवणे येथील जंगलात गव्याने पिल्लाला जन्म दिल्याचे गुरख्यांच्या निदर्शनास आल्याची चर्चा आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाला कळवण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 22/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow