खेड : नाल्यात सांडपाणी सोडल्याचा प्रकार; लोटे परिसरातील 'त्या' कंपनीचा शोध सुरूच

Aug 23, 2024 - 10:04
Aug 23, 2024 - 11:56
 0
खेड : नाल्यात सांडपाणी सोडल्याचा प्रकार; लोटे परिसरातील 'त्या' कंपनीचा शोध सुरूच

खेड : लोटे परिसरातील घाणेखूंट कोतवली नाल्यामध्ये रासायनिक सांडपाणी राजरोस सोडल्याने मच्छीमारांसह स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सांडपाणी सोडणाऱ्या कंपनीचा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शोध घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्यांना कंपनीचा शोध घेण्यात यश आलेले नाही. त्यामुळे सांडपाणी सोडण्याचे कृत्य करण्याची "योजना" कोणाची आहे, याची चर्चा रंगू लागली. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कंपन्या पावसाळ्यात आपले रासायनिक सांडपाणी सामुदायिक सांडपाणी प्रकल्प केंद्रात न सोडता थेट पूर्वेकडून पश्चिमेकडे येणाऱ्या नाल्याला सोडतात. 

दुर्दैवाने हा नालाही या सामुदायिक सांडपाणी प्रकल्पाशेजारीच असल्याने अनेकांचे फावते. काही दिवसरांपूर्वी पाणेखुंट कोतवली गावातील नाल्यात असेच रासायनिक सांडपाणी सोडण्यात आल्याचा प्रकार पडला होता. त्यामुळे या नाल्याचे पाणी लाले लाल झाले होते. हाच नाला पुढे खाडीत जाऊन मिळत असल्याने मासेमारीवर परिणाम होणार आहे. तसेच पाणेखूंट, सोनगाव, कोतवली व पुढे
खाडी किनाऱ्याजवळच्या शेतीवर परिणाम होतो. मात्र, सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी तातडीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येण्यास टाळाटाळ केली असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. उपप्रादेशिक अधिकारी जोपर्यंत घटनास्थळी येत नाही, तोपर्यंत या क्षेत्रीय अधिकाऱ्याला सोडणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने उपप्रादेशिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

घाणेखूंट कोतवलीच्या नाल्यामध्ये रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या त्या कंपनीचा शोध प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिका-यांनी घ्यावा या घटनेला काही दिवस उहटून देखील या संदर्भात अद्यापही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे घाणखूंट पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपली भूमिका मांडावी अन्यथा स्थानिक ग्रामस्थांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला घेराओ घालू, - विनोद चाळके, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 23/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow