रत्नागिरी : जिल्ह्यातील युवक-युवतींना जर्मन भाषा प्रशिक्षणासाठी आवाहन

Aug 23, 2024 - 16:21
Aug 23, 2024 - 16:24
 0
रत्नागिरी : जिल्ह्यातील युवक-युवतींना जर्मन भाषा प्रशिक्षणासाठी आवाहन

रत्नागिरी : युरोपीय देशांमध्ये औद्योगिक क्षेत्र मोठ आहे. या देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. हाच धागा पकडत महाराष्ट्र शासनाने युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जर्मनीचा पर्याय ठेवला आहे. शासनातर्फे बेरोजगार युवक-युवतींना जर्मनीत रोजगारासाठी पाठवण्यात येणार आहे. यासाठी जर्मनी भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बेरोजगारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासनातर्फे करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपीयन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर महराष्ट्र राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. ही बाब लक्षात घेऊन शासनाने २५ फेब्रुवारी २०२४ रोजी जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करुन उपलब्ध करुन देण्याबाबत सामंजस्य करार केला आहे. यासाठी जर्मन भाषा शिकवण्याचे प्रशिक्षण शासनातर्फे देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. जर्मन भाषा शिकवण्यासाठी ग्योथे इन्स्टिट्यूट, मॅक्सम्युलर भवन, पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. राज्यस्तरावर २५ विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण वर्ग याप्रमाणे १० हजार विद्यार्थ्यांसाठी ४०० प्रशिक्षण वर्गाची सोय करण्यात आली आहे. यासाठी शासनाने ७६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विद्यार्थी निवडताना काही समिती गठित केल्या आहेत. यामध्ये जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती, राज्यस्तरीय सनियंत्रण समिती, तांत्रिक समिती यांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात १० हजार विविध क्षेत्रातील युवकांना जर्मनीत पाठवण्यात येणार आहे. यामध्ये परिचारिका, वैद्यकीय सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, रेडिओलॉजी सहाय्यक, दंतचिकित्सा सहाय्यक, आजारी व वृद्ध व्यक्तींचा काळजीवाहक, दस्तऐवज व कोडींग, त्रयस्त प्रशासन, वैद्यकीय लेखा व प्रशासन, सेवक, वेटर, स्वागतकक्ष संचालक, स्वयंपाकी, हॉटेल व्यवस्थापक, लेखाधिकारी, स्वच्छक, गोदाम व्यवस्थापक, विक्री सहाय्यक, वीजतंत्री, अक्षय ऊर्जेसाठी विजतंत्री, औष्णिक विजतंत्री, रंगारी, सुतार, गवंडीकाम, नळ जोडणी, हलक्या व जड वाहनांचा तंत्रज्ञ, वाहनचालक, सुरक्षा रक्षक, टपाल सेवा, सामान बांधणी व वाहतूक, विमानतळावरील सामान हाताळणी यांचा यामध्ये सामावेश आहे.

इच्छुक असणाऱ्या पात्र व कुशल युवकांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी https://maa.ac.in/ Germany Employment/ या वेबसाईटवर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती देण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी प्राचार्य सुशील शिवलकर, नम्रता शेजाळ, राहुल बर्वे आदी उपस्थित होते.

जि. प. च्या शिक्षकांना संधी
प्रशिक्षण वर्गासाठी जर्मन भाषेची अर्हता बीए इन जर्मन, एमए इन जर्मन व ग्योथे इन्स्टिट्यूट यांचेद्वारे घेण्यात येणारी स्तरनिहाय ए १, ए२, बी १, बी २, सी १, सी २ उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांची संख्या पुरेशी नाही. यामळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये नियमित शिक्षकांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण वर्ग शासनामार्फत मोफत घेण्यात येणार आहेत. यासाठी या शिक्षकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:49 PM 23/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow