''शरद पवारांनी किती देवळं बांधली, राहुल गांधींचा धर्मच कळत नाही'' : नारायण राणे

Aug 28, 2024 - 12:08
 0
''शरद पवारांनी किती देवळं बांधली, राहुल गांधींचा धर्मच कळत नाही'' : नारायण राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. विशेष म्हणजे 8 महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेला हा पुतळा वाऱ्याच्या वेगाने कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली.

या घटनेनंतर राज्यातील विरोधकांनी पुतळ्याच्या उभारणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी घटना घडल्यानंतर तात्काळ घटनास्थळ गाठून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. कमिशन आणि टक्केवारीमुळे दर्जेदार काम झालं नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांकडून छत्रपतींच्या पुतळा प्रकरणाचं राजकारण केलं जात असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय. आता, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी याबाबत बोलताना थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केला.

सिंधुदुर्गात (Sindhudurg) घडलेली पुतळा घटना दुर्दैवी आहे, उद्या मी दुपारी 12 वाजता घटनास्थळी जाणार आहे आणि दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. मात्र, काल एक आमदार बांधकाम विभागाचं ऑफीस फोडण्यासाठी गेला. तो ऑफिस फोडण्यासाठी गेला ते ऑफीस बंद झाल्यावर आणि मिरवतो की मी निष्ठावान आमदार आहे. हा निष्ठावान आमदार सकाळी मातोश्री आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्याकडे असतो, असे नारायण राणेंनी (Narayan Rane) म्हटले. तसेच, आमदार झाल्यापासून कळलं नाही का, की तिथं जाऊन पुतळा पहावा, असा टोलाही राणेंनी नाव न घेता आमदार वैभव नाईक यांना लगावला. यावेळी, शरद पवार (Sharad pawar) यांच्यावरही टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही याप्रकरणावरुन राज्य सरकारवर टीका केलीय. त्यावरुन, आता नारायण राणेंनी थेट शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केला. ''पवार साहेबांनी किती देवळं बांधली सांगा, यांना चांगलं काहीचं दिसत नाही. मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाणारी माणसं आहेत. राहुल गांधींबाबत तर काय बोलावं, त्यांचा धर्म कोणता आहे हेच कळत नाही'', अशा शब्दात राणेंनी विरोधकांना टोला लगावला. जे विरोधक आता पुतळ्याबाबत बोलत आहेत त्यांनी 8 महिन्यांत पुतळा कसा झाला आहे, हे बघितलं का ? त्याला एखादा हार घातला का?, असा सवालही राणेंनी उपस्थित केला आहे.

याप्रकरणाची चौकशी केली जाईल

कालचा हवेचा स्पीड बघा, घर पडतात, बिल्डिंग पडतात. बंदशिवाय यांना काय येतं. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. काँग्रेस सगळ्या क्षेत्रात बदनाम आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. या सगळ्यांना मी उघडं करीन, असेही नारायण राणेंनी म्हटलं.

पुतळा कोसळल्यानंतर आंदोलनं

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूटी पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर अहमदनगरमध्ये मराठा समाजाच्यावतीने राज्य सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यासह संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ले आणि पुतळे उभारण्यात आले त्या पुतळ्यांना साधी चीर देखील पडली नाही, मात्र महायुती सरकारने उभारलेला पुतळा साडेतीनशे दिवसाच्या आत कोसळल्याने हे सरकार भ्रष्ट असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी या निदर्शनावेळी करण्यात आली.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 28-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow