Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रात काँग्रेसचं जोरदार 'कमबॅक'..!

Jun 4, 2024 - 15:04
 0
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रात काँग्रेसचं जोरदार 'कमबॅक'..!

मुंबई : महाराष्ट्रातील ४८ जागांसह देशातील ५४३ जागांचा निकाल आता हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. त्यात राज्यातील ४८ जागांवर महायुतीला जबरदस्त फटका बसला आहे. मिशन ४५ चं स्वप्न बघणाऱ्या महायुतीला राज्यात २० जागाही मिळणं अवघड झालं आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यात १७ जागा लढवणाऱ्या काँग्रेसला ११ ते १२ जागांवर आघाडी आहे. महाराष्ट्रात गेल्या २ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. परंतु यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं चांगली कामगिरी केली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होती. त्यात काँग्रेस १७, ठाकरे गट २१ आणि १० जागांवर शरद पवारांची राष्ट्रवादी लढत होती. या निवडणुकीत महायुतीकडून सर्वाधिक २८ जागा भाजपानं लढवल्या त्याखालोखाल शिवसेनेनं १५, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४ आणि महादेव जानकर यांनी १ जागा लढवली होती. आजच्या निकालात महायुती १९ तर महाविकास आघाडी २८ जागांवर आघाडी आहे.

कोणत्या पक्षाला किती जागांवर आघाडी?

भाजपा - १३
शिवसेना (शिंदे) - ५
अजित पवार - ०१
उद्धव ठाकरे - ११
शरद पवार - ६
काँग्रेस - ११

दरम्यान, भाजपाने फोडफाडीचे राजकारण केले हे जनतेला आवडले नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ होईल. शेतकरी, बेरोजगार यांचे प्रश्न असताना त्याकडे भाजपा सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आले अशी टीका काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी महायुतीवर केली.

काँग्रेसचा राज्यातील पहिला विजय नंदूरबारला

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सलग दोनदा खासदार राहिलेल्या भाजपाच्या हिना गावित यांचा काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांनी १ लाख ७२ हजार मतांनी पराभव करत विजय मिळवला. तब्बल एक दशकानंतर काँग्रेसने नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आपले अस्तित्व सिद्ध केलं. पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे गोवाल पाडवी आघाडीवर होते. काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:27 04-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow