म्हशी विक्रीच्या बहाण्याने अडीच लाखांची फसवणूक

Jun 4, 2024 - 15:23
 0
म्हशी विक्रीच्या बहाण्याने अडीच लाखांची फसवणूक

रत्नागिरी : मुऱ्हा जातीच्या ६ म्हशी विक्री करण्याच्या बहाण्याने तरुणाची तब्बल २ लाख ६३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी दोन संशयितांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची ही घटना २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १.४१ ते २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.२० वा. कालावधीत वेतोशी येथे घडली आहे.

अनिस आदमभाई घांची ऊर्फ आबू व अमितभाई आदमभाई घांची (दोन्ही रा. थराद, गुजरात) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात जगदिश कृष्णा झोरे (२९, रा. वेतोशी धनगरवाडी, रत्नागिरी) यांनी रविवार २ जून रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

त्यानुसार, जगदिश झोरे हे दुग्ध व्यावसायिक असून ते वेतोशी येथे म्हशी पाळून दुग्ध व्यवसायाद्वारे उपजीविका करतात. त्यांना मुऱ्हा जातीच्या म्हशींची दुग्ध व्यवसायासाठी गरज होती. त्यासाठी त्यांनी त्यांचा मित्र आशिष माने याने मुऱ्हा जातीच्या म्हशी खरेदी केल्या असल्याने त्याच्याकडे चौकशी केली. या दोघांनी मोबाईलवरुन दोन्ही संशयित आरोपींशी मोबाईलवर संपर्क करुन आपल्याला मुऱ्हा जातीच्या सहा म्हशी पाहिजे असल्याचे कळवले. त्यानुसार संशयितांनी त्यांना व्हॉटॲपवर म्हशींचे फोटो आणि व्हिडिओ पाठवले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी झोरे यांनी संशयितांना फोन पेव्दारे प्रथम ९८ हजार रुपये आणि त्यानंतर बँक खात्यात १ लाख ६५ हजार रुपये असे एकूण २ लाख ६३ हजार रुपये पाठवले. त्या नंतर आरोपींनी फिर्यादींना दोन दिवसात म्हशी पाठवतो, असे सांगितले. मात्र, दोन दिवसांनंतरही म्हशी आल्या नाहीत तसेच आरोपींनी फिर्यादीशी संपर्कही बंद करत त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी तीन महिन्यांनी फिर्यादीने ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून संशयितांविरोधात भा. दं. वि. कायदा कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:52 04-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow