छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कपाळावर जाणीवपूर्वक जखमेची खूण ठेवली; अमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ

Aug 29, 2024 - 15:04
 0
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कपाळावर जाणीवपूर्वक जखमेची खूण ठेवली; अमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

तर, या घटनेवरुन महायुतीतही ठिणगी पडल्याची चर्चा आहे. या घटनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी जनतेची जाहीर माफी मागितली होती. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज काळी पट्टी बांधून मुक आंदोलन करण्यात येत आहे.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी शिल्पकार जयदीप आवटेवर गंभीर आरोप केला आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याने जाणीपूर्वक महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर खोप (जखमेची खूण) ठेवून दिल्याचा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच, शिल्पकार जयदीप आपटेला पुतळा घडविण्याचे कंत्राट कुणी दिले, याची चौकशी करण्याची मागणी अमोल मिटकरी यांनी केली. ते गुरुवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

"मी स्पष्टपणे सांगितले की, आपटे नावाचा व्यक्ती त्याला साधा प्रपंच चालवायची अक्कल नाही. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचं कंत्राट कोणी आणि कसं दिलं हेच हास्यास्पद आहे. जयदीप आपटेने हे काम कसे केले? जयदीप आपटेला हे कंत्राट कसे मिळाले? कोणता मंत्री त्याला पाठीशी घालतोय?, याची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की, जयदीप आपटे हा जिथे कुठे दडून बसला असेल त्याला शोधून काढावे", असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याला खोप ही जाणीवपूर्वक दाखवण्यात आल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला आहे. शिवाजी महाराजांचे जगभरात जितके पुतळे आहेत, कोणत्याही पुतळ्यात डाव्या भुवयाच्यावर खोप दाखवण्यात आलेली नाही. पण, हे जाणीवपूर्व चुकीचा इतिहास महाराष्ट्राच्या माथी मारला गेला. शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्यांवर खोप का दाखवली गेली? याचा खुलासा नौदल किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा, अशी मागणी सुद्धा अमोल मिटकरी यांनी केली आहे.

दरम्यान, ४ डिसेंबर २०२३ रोजी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतण्याचे अनावरण करण्यात आले होते. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पुतण्याचे अनावरण झाले होते. मात्र, ८ महिन्यातच हा पुतळा कोसळल्याने राज्यातून संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सध्या हे दोघही फरार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:33 29-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow