प्रक्षोभक भाषण प्रकरणी भास्कर जाधवांना जामीन

Sep 3, 2024 - 14:19
 0
प्रक्षोभक भाषण प्रकरणी भास्कर जाधवांना जामीन

सिंधुदुर्ग : प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी माजी मंत्री आमदार भास्कर जाधव याना ७ हजार ५०० रुपयाचा जामीन कुडाळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी समीर कुलकर्णी यांनी मंजूर केला.

सोमवारी भास्कर जाधव कुडाळ न्यायालयात हजर झाले.

याबाबतची हकीगत अशी अँन्टी करप्शनने आमदार वैभव नाईक यांना मालमत्ते संदर्भात चौकशी नोटीस काढल्यानंतर शिवसेना उबाठासह महाविकास आघाडीने कुडाळ येथील अँटी करप्शन कार्यालयावर १८ ऑक्टोबर २०२२ रोजी धडक मोर्चा काढला होता. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी प्रशोभक भाषण केले होते. त्यांच्यावर वैयक्तिक तसेच सामूहिक १५ जणांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी श्री जाधव यांच्यासह संजय पडते, सतीश सावंत, रुपेश पावसकर, जान्हवी सावंत, अमित सामंत, व अन्य सोमवारी कुडाळ न्यायालयात हजर झाले. त्यांना प्रत्येकी ₹ ७,५००/- चा जामीन मंजूर करण्यात आला. यावेळी न्यायालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूण पाच राजकीय केसेस मधील संशयीतांच्या काल कोर्टात तारखा होत्या.

अँटी करप्शन कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या वेळी झालेल्या सभेच्या वेळी आमदार भास्कर जाधव यांनी प्रक्षोभक भाषण केले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर एक गुन्हा दाखल केला होता. तसेच मोर्चा काढल्याने खासदार अरविंद सावंत यांच्यासह भास्कर जाधव, अरुण दुधवडकर , संजय पडते, राजन शिवराम नाईक, गौरीशंकर खोत, सतीश सावंत, संतोष शिरसाट, रुपेश पावसकर आत्माराम उर्फ अतुल बंगे, संदेश पारकर जान्हवी सावंत, अमित सामंत, इर्शाद शेख, अभय शिरसाट, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी काहीजण सोमवारी न्यायालयात हजर झाले?. यांच्या वतीने ऍड. सुधीर राऊळ, ऍड. हीतेश कुडाळकर यानी काम पाहिले.

दरम्यान पेट्रोल दरवाढ आंदोलन, कुडाळ नगरपंचायत येथे झालेल्या वादाच्या गुन्ह्यातील संशयीताचीही केस सोमवारी होती. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात आमदार लोकप्रतिनिधी यांच्यासह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:47 03-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow