महाराष्ट्रातील चार लाख युवकांना जर्मनीत रोजगाराची संधी

Sep 4, 2024 - 16:15
Sep 4, 2024 - 16:22
 0
महाराष्ट्रातील चार लाख युवकांना जर्मनीत  रोजगाराची संधी

पुणे : जगात वयोवृद्ध लोकांची संख्या वाढत असताना भारतात मात्र तरुणांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जवळपास २२ देशांमधून भारताकडे मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. यातूनच राज्य शासनाने जर्मनी देशातील बाडेन युटेनबर्ग या राज्याशी सामंजस्य करून ३१ कौशल्यांशी संबंधित मनुष्यबळ पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १० हजार युवकांना व येत्या दीड वर्षात १ लाख तर एकूण ४ लाख विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन जर्मनीत नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची शिक्षणमंत्री दीपक केसरकर तसेच विद्या  प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

युरोपियन युनियनमधील बहुतांशी देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न असून मागील काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. ही बाब विचारात घेऊन राज्यातून पहिल्या टप्प्यात १० हजार कुशल मनुष्यबळ जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग राज्यास उपलब्ध करुन देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे कुशल युवक-युवतींना रोजगाराची संधी
निर्माण होणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

यापूर्वी उच्च माध्यमिक शिक्षणाचे व्यवसायीकरण ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जात असे. या योजनेनुसार शिक्षणातून रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग व व्यवसाय यासाठीच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. या योजनेचा विस्तार करून हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या पथदर्शी प्रकल्पासाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती, राज्यस्तरीय सनियंत्रण समिती व तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे मुख्य समन्वयक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य असतील. जिल्हा शल्य चिकित्सक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त, औद्यागिक प्रशिक्षण संस्था व तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य, सहायक कामगार आयुक्त व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे सदस्य असतील.

कुणाला आहे जर्मनीत कामाची संधी...
बाडेन बुटेनबर्ग राज्यास पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवांमधील व्यावसायिक मनुष्यबळ, ज्यामध्ये परिचारिका (रुग्णालय), वैद्यकीय सहायक (एमएफए), प्रयोगशाळा सहायक, रेडियोलॉजी सहायक, दंतशल्य सहायक, आजारी व वृद्ध व्यक्तींसाठी शुश्रूषा सेवक, फिजिओथेरपिस्ट, दस्तऐवजीकरण आणि संकेतीकरण (डॉक्युमेंटेशन अँड कोडिंग) / तृतीय पक्ष प्रशासन (थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेशन), लेखा व प्रशासन मधील कर्मचारी यांचा समावेश असेल. आतिथ्य सेवांमधील वेटर्स, सर्व्हर्स, स्वागत कक्ष संचालक (रिसेप्शनिस्ट), आचारी (कुक), हॉटेल व्यवस्थापक, लेखापाल, हाऊसकीपर, स्वच्छक, कारागीर तंत्रज्ञांमध्ये विद्युततंत्री (इलेक्ट्रिशियन), नविनीकरण ऊर्जेमधील विशेष विद्युततंत्री (रिन्यूएबल एनर्जी, सोलर आदी), औष्णिक वीजतंत्री (हिंटिंग तंत्रज्ञ), रंगारी, सुतार, वीटकाम, टाईल्स बसविणारे, प्लंबर्स, हलक्या व जड वाहनांची दुरुस्ती करणारे तंत्रज्ञ या पदांचा समावेश असेल. याशिवाय बस, ट्राम, ट्रेन, ट्रक आदीचे वाहन चालक, सुरक्षा रक्षक, टपाल कर्मचारी, सामान बांधणी व वाहतूक करणारे (पॅकर्स व मूव्हर्स), विमानतळावरील सहायक, स्वच्छताकर्मी, सामान हाताळणारे (बंगेज हैंडलर्स) विक्री सहायक व गोदाम सहायक आदी कुशल मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना कौशल्यांचे प्रशिक्षण देताना त्याबाबतची काही मानके निश्चित करणे गरजेचे आहे. ज्या देशात जायचे आहे त्या देशाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे. गोएथे संस्थेबरोबर जर्मन भाषा प्रशिक्षणाच्या दृष्टीने करार करुन भाषा प्रशिक्षणाला गती देण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील कौशल्याधारित मनुष्यबळाची मागणी असल्याने शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून या कार्यक्रमाला गती देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत युवकांना कौशल्य प्रशिक्षण, भाषेचे शिक्षण मोफत देण्यात येणार असून पासपोर्ट, व्हिसा तसेच परदेशात जाणे, तेथे स्थीरस्थावर होण्याच्या दृष्टीने सर्व सहकार्य केले जाणार आहे. -दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

या प्रकल्पांतर्गत राज्यातील कुशल, अकुशल बेरोजगार युवक-युवतींना जर्मनी येथे नोकरी मिळविण्यासाठी राज्यातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप, व्हिसा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे. ही राज्यातील युवक-युवतींना त्यांचे आर्थिक, सामाजिक स्थान तसेच जीवनमान उंचावण्याची मोठी संधी आहे. - राहुल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:37 PM 04/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow