रत्नागिरी : विनापरवाना बंदुकीची वाहतूक प्रकरणी आरोपीची निर्दोष सुटका

Jun 5, 2024 - 14:26
Jun 5, 2024 - 14:28
 0
रत्नागिरी : विनापरवाना बंदुकीची वाहतूक प्रकरणी आरोपीची निर्दोष सुटका

रत्नागिरी : विनापरवाना बंदुकीची वाहतूक करताना कुणाल रमेश देसाई (३४ रा. माळनाका रत्नागिरी) याला तपासणी नाक्यावर पकडण्यात आले. त्याच्या विरुद्ध न्यायालयात खटला चालला. या खटल्यात आवश्यक पुरावे सादर करण्यामध्ये सरकार पक्ष अपयशी ठरला. यामध्ये कुणाल याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

मनोज बंडू लिंगायत हे पोलीस कॉन्स्टेबल २४/९/१५ रोजी रात्री १ ते ४ या कालावधीत ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यासाठी आदेशीत केले होते. परटवणे तिठा रत्नागिरी येथे अन्य सहकाऱ्यांसोबत नाकाबंदी ड्युटी नेमण्यात आली होती. परटवणे तिठा या ठिकाणी येणारी जाणारी वाहने तपासत असताना रात्री ३ वाजण्याच्या सुमारास उद्यमनगर या ठिकाणी येणारा एकजण मांडीवर बंदूक ठेवून मोटरसायकलने गणपतीपुळेकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होता. त्याला थांबवून बंदुकीच्या परवान्याबाबत पोलिसांनी विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. अंगझडती घेतली असता सिंगल बॅरल काडतूस बंदूक, पाच जिवंत काडतूसे असे आढळून आले.

यानंतर रत्नागिरी पौलीस स्थानकात विना परवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पंचनामा करुन मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर कुणाल रमेश देसाई याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. संशयावरुन खोट्या खटल्यात गुंतवण्यात आल्याचा बचाव त्याने केला.

मुख्य न्यायदंडाधिकारी रा.म.चौत्रे यांनी समोर आलेले पुरावे लक्षात घेऊन याप्रकरणाचा निर्णय दिला. या खटल्यातील जप्ती पंचनाम्यातील पंच अमोल पाटील याने सांगितले की, त्याच्या समक्ष नमुद ऐवज कधीही जप्त करण्यात आला नव्हता. यामुळे अभियोग पक्षाची कथा संशयाच्या भोवऱ्यात अडकली. साक्षीदार रवीराज मुरलीधर लंबे यानेही सिंगल बॅरल रायफल व जिवंत काडतुसे जप्ती पंचनामा आपल्यासमोर करण्यात आल्याचे नाकारले. यामुळे अभिलेखासमोर उपलब्ध असलेला पुरावा अत्यंत त्रोटक स्वरुपाचा आहे असे न्यायालयाने नमूद केले. गस्ती, नाकाबंदी पथकाची नियुक्ती रितसर करण्यात आली होती. या पथकाच्या नियुक्तीत कोणाकोणाचा समावेश होता याचा कोणताही पुरावा न्यायालयात सादर झाला नाही.

नाकांबदी आदेश झाल्याची नोंद अभिलेखावर कर्मचाऱ्यांची नोंद स्टेशन डायरीला, कर्मचारी रजिस्टरला केली जाते. हे पथकाचे कर्मचारी असल्याबद्दल नोंद किंवा उतारा सादर करून शाबित करणे आवश्यक होते. परंतु अभियोग पक्ष त्या कामी अपयशी ठरल्याचे दिसून येते. घटनास्थळी रात्री अपरात्री वाहनांची व लोकांची वर्दळ असते. त्याठिकाणी त्रयस्थ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची उपलब्धता असते. अशावेळी प्रत्यक्ष साक्षीदार अभिलेखावर उपलब्ध नसणे हे अभियोग पक्षाच्या कथेला बाधक ठरते, असेही न्यायालयाने नमुद केले. एकही त्रयस्थ पंच साक्षीदार जप्ती पंचनाम्यास पुष्टी करण्यास पुढे येत नाही. नेमणूक मुद्देमाल आवक आदी नोंदी सादर करण्यात आल्या नाहीत. जप्त बंदूक व काडतुसे हा मुद्देमाल न्यायालयात सादर करुन त्याची ओळख अभियोग पक्षाच्या साक्षीदारांकडून शाबित करण्यात आले नाहीत. त्यामुळे जप्त बंदूक आरोपीच्या ताब्यात मिळून आली या गोष्टीची सुसंगतता दाखवता आलेली नाही. संशयाचा फायदा आरोपीच्या बाजूने जातो. हे प्रकरण निःसंशयपणे शाबित होणारे नाही. त्यामुळे देसाई याची निर्दोष मुक्तता करण्यात येते, असे न्यायालयाने नमूद केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:55 05-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow