लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका: तिन्ही पक्षाचे नेते दिल्लीत एकत्र.. शिंदे-फडणवीस-अजित पवारांमध्ये खलबतं सुरू

Jun 7, 2024 - 15:56
 0
लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका: तिन्ही पक्षाचे नेते दिल्लीत एकत्र.. शिंदे-फडणवीस-अजित पवारांमध्ये खलबतं सुरू

वी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या निकालात महाराष्ट्रात भाजप महायुतीच्या (Mahayuti) जागा मोठ्या प्रमाणात घटल्या आहेत. गत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 43 जागांवर विजय मिळवणाऱ्या महायुतीला यंदा केवळ 17 जागांवरच विजय मिळाला आहे.

त्यापैकी, भापला 9 जागांवर विजय मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली. त्यामुळे, महायुतीच्या नेत्यांमध्ये काही प्रमाणात तणावाचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे. मात्र, आमच्या मित्र पक्षातील समन्वयावर एकत्र बसून चर्चा करू, निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषदेतून म्हटले होते. त्यानंतर, आता राजधानी दिल्लीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी ही बैठक होत असून बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात भाजप महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या, विशेष म्हणजे बीड, बारामतीसह अनेक महत्त्वाच्या जागांवर महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे, या पराभवाचं चिंतन भाजपसह मित्र पक्षांकडून होत आहेत. त्यातच, आज एनडीए आघाडीच्या बैठकीसाठी राज्यातील प्रमुख पक्षांचे नेते दिल्लीत पोहोचले आहेत. एनडीएच बैठकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला गटनेता म्हणून पाठिंबा दिला. त्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी सर्वच प्रमुख नेत्यांची बैठक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार येथे पोहोचले असून काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पटेल यांच्या बंगल्यावर येत आहेत.

राज्यातील महायुतीच्या बीड आणि बारामतीमधील पराभवाची चर्चा सर्वत्र आहे. त्यामुळे, येथील पराभवाचं मंथन करण्याचं काम दिल्लीत सुरू झालं की काय, असे म्हणता येईल. कारण, अजित पवार यांनी गुरुवारी रात्री उशिरा निवडणूक निकालातील पराभवावर भाष्य केलं. बारामतीमधील निकाल हा माझ्यासाठी देखील आश्चर्याचा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. कारण, 1991 पासून मी बारामतीच्या राजकारणात आहे, पहिल्यांदा खासदार झालो, तेव्हापासून बारामतीकरांनी मला निवडून दिलं, माझ्यावर प्रेम केलं, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे, दिल्लीतील बैठकीत बारामती व बीडमधील पराभवाची चर्चा होऊ शकते. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी कशारितीने रणनिती आखायची, राज्य मंत्रिमंडळ विस्तार यावरही खलबतं होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काल अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं होतं. माझं देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं झालं त्यांनी आज दिल्लीमध्ये आपण स्पष्टपणे भेटून बोलू असं म्हटलं होतं. त्याच अनुषंगाने ही भेट आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी त्यांची मन धरणी करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर अद्याप ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत

महाराष्ट्राच्या तिन्ही नेत्यांच्या बैठकीमध्ये काय चर्चा होऊ शकते?

1) देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर जर ते प्रशासनातून बाजूला झाले तर पुढे काय?

2) नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अजित दादा भेटणार आहेत तत्पूर्वी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे

3) पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जून रोजी शपथ घेत आहेत. या शपथविधीच्या वेळी इतर मंत्री देखील शपथ घेण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन मंत्री पदांची मागणी करण्यात आलेली आहे तर सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट मिळण्याची शक्यता आहे याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे

प्रफुल्ल पटेलांच्या बंगल्यावर दिग्गज एकत्र

दरम्यान, महायुतीत राहूनही महायुतीतील अनेक प्रश्नांवर जाहीरपणे भाष्य करणारे मंत्री छगन भुजबळ हेही आ दिल्लीत आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ हे देखील बैठकीत उपस्थित आहेत. यासह, खासदार रक्षा खडसे आणि स्मिता वाघ ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीसाठी प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:20 07-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow