कोकणात मोसंबी लागवडीचा यशस्वी प्रयोग!

Jun 7, 2024 - 16:27
 0
कोकणात मोसंबी लागवडीचा यशस्वी प्रयोग!

रत्नागिरी : नैसर्गिक दृष्टचक्रामुळे आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावत असल्याने शेतकऱ्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. नाखरे येथील प्रयोगशील शेतकरी शैलेंद्र सदानंद शिंदे-दसूरकर यांनी पाच एकर क्षेत्रांवर मोसंबीची लागवड चार वर्षांपूर्वी केली होती.

कोकणातील लाल मातीतील मोसंबी लागवडीचा पहिला प्रयोग असून, तो यशस्वी झाला आहे. सध्या त्यांच्या बागेतील झाडांना मोसंबी लगडल्या आहेत. शैलेंद्र हे कला शाखेचे पदवीधर आहेत. त्यांनी शिक्षणानंतर नोकरीऐवजी शेतीचा पर्याय निवडला.

८० एकर क्षेत्राचे नियोजन करून आंबा, काजू, मोसंबी, नारळ लागवड केली आहे. त्यांनी अभ्यास करून मोसंबी लागवडीचा निर्णय घेतला. एकूण ५०० मोसंबीची रोपे आणून लागवड केली आहे, तसेच १०० लिंबाची लागवड केली आहे. मोसंबीला दोन बहर येतात. मृग बहर जानेवारीत, तर अंबिया बहार जून-जुलैमध्ये येतो.

अंबिया बहर घेण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. लागवडीनंतर चार ते पाच वर्षांनी उत्पादन सुरू होते. वर्षाला दहा ते १२ टन मोसंबीचे उत्पादन येईल, असा त्यांना विश्वास आहे. त्यादृष्टीने लागवडीपासून रोपांचे जतन करून वेळेवर पाणी, खते देत आहेत.

त्यामुळे मोसंबीची रोपे चांगली तरारली असून, मोसंबी झाडावर लगडल्या आहेत. लागवडीनंतर उत्पादन खर्च मिळणारा दर याचा ताळमेळ बसला तर भविष्यात ४० एकर क्षेत्रात मोसंबी लागवड वाढविण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला आहे. कृषितज्ज्ञ संदीप डोंगरे यांचे ते मार्गदर्शन घेत आहेत.

नगदी पिकाची निवड
- 
मोसंबी नगदी पीक असल्याने लागवडीसाठी शैलेंद्र यांनी 'न्यू सेलर' जातीचे वाण निवडले आहे. गोड, पातळ सालीच्या मोसंबी टिकावू असून, रंगही आकर्षक आहे. तीन ते चार वर्षानंतर मोसंबीचे उत्पादन सुरू होते. त्यानुसार त्यांच्याकडील उत्पादन सुरू झाले आहे.
- शैलेंद्र यांनी लिंबू लागवडीसाठी 'साई सरबती' व 'बालाजी' या वाणाची निवड केली आहे. लागवडीसाठी श्रीगोंदा येथून मोसंबी व जालना येथून लिंबाची रोपे आणली होती.
- लागवडीनंतर तीन ते चार वर्षात उत्पादन सुरू होत असले तरी प्रत्यक्ष पाच वर्षांनंतर उत्पादनात वाढ होते. दरवर्षी किमान दहा ते बारा टन मोसंबीचे उत्पादन मिळेल असा विश्वास आहे.

कुटुंबीयांचे सहकार्य
- 
शैलेंद्र यांचे शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग सुरू असतात. पत्नी शिवप्रिया, मुलगा चंद्रवदन, भाऊ उदय, वहिनी उत्कर्षा यांचे शेताच्या कामासाठी चांगले सहकार्य लाभत असल्याचे शैलेंद्र यांनी सांगितले.
- सध्या पाच एकर क्षेत्रांत लागवड केलेली मोसंबी, लिंबू लागवड ५० एकर क्षेत्रावर विस्तारित करण्याचा मानस असल्याचे सांगितले.

बागायतीमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी लागवड करून उत्पादन सुरू झाले आहे. काजू, सुपारीसाठी चांगला भाव मिळाला की, विकून टाकतो. आंब्यासाठी खासगी विक्री करताना जोडलेले ग्राहक दरवर्षी संपर्कात असतात. नारळ मात्र स्थानिक बाजारपेठेत संपतात. अभ्यास करून मोसंबी लागवडीचा निर्णय घेतला आहे. मोसंबी लागवड करण्यापूर्वी अवघड वाटत होतं. परंतु, आता रोपांची वाढ चांगली झाली आहे. लाल मातीत हा प्रयोग यशस्वी होईल, अशी खात्री आहे. शेतीच्या सर्व कामांसाठी कुटुंबीयांचे सहकार्य लाभत आहे. - शैलेंद्र शिंदे-दसूरकर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:55 07-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow