लांजा तालुक्यातील तीन गावे, सहा वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

May 27, 2024 - 10:49
May 27, 2024 - 11:04
 0
लांजा तालुक्यातील तीन गावे, सहा वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

लांजा : दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. सद्यस्थितीत तीन गावे आणि सहा वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर आणखी २ गावे व ३ वाड्यांचे अर्ज लांजा पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. पुढील काही दिवसांत या पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करत असताना देखील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे हे चित्र कधी बदलणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लांजा तालुक्यातील काही गावांमध्ये दरवर्षी होणारी पाणीटंचाई हे नित्याचीच बाब बनली आहे. दरवर्षी सर्वाधिक पाणी टंचाईच्या झळा चिंचुर्टी धावडेवाडीत येथे बसतात. या भागात नोव्हेंबर मध्येच तीव्र पाणीटंचाई सुरू होते. चिंचुर्टी धावडेवाडी ही डोंगर माथ्यावर वसलेली असल्याने या ठिकाणच्या ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. मात्र टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा अपुरा असल्याने एप्रिल, मे महिन्यात या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे.

सद्यस्थितीत लांजा तालुक्यात पालू, हर्दखळे आणि कोचरी या तीन गावांना तीव्र पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे. या गावांमधील चिंचुर्टी धावडेवाडी, हुंबरवणे, कोचरी-धनगरवाडी, भोजवाडी आणि ढोलमवाडी, हर्दखळे-धनगरवाडी या गावे व वाड्यांना तीव्र पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. या पाणी टंचाई संदर्भात गावातून लांजा पंचायत समितीकडे टँकरची मागणी केली होती. त्यानुसार या गावे आणि वाड्यांना पंचायत समितीच्या एका टँकरद्वारे सद्यस्थितीत पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, हा पाणीपुरवठा अपूरा असल्याने येथील ग्रामस्थांचे पुरते हाल होत आहेत. पाण्याअभावी गावात दाखल झालेले चाकरमानी देखील मुंबईला परतत असल्याचे चित्र दिसून येत आहे. इतकी भीषण पाणीटंचाई या गावांमध्ये निर्माण झाली आहे.

त्याचप्रमाणे वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने पाणीटंचाईची गावे आणि वाड्या यामध्ये देखील वाढ होत आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी तालुक्यातील आणखी दोन गावे व तीन वाड्यांचे अर्ज पंचायत समितीकडे सादर झाले आहेत. यामध्ये आरगाव राजापकरवाडी, यद्रेवाडी आणि कुरंग पठारवाडी यांचा समावेश आहे.

पाणीटंचाईने हैराण झालेले तालुक्यातील ग्रामस्थ आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थांना पावसाची प्रतीक्षा लागली असून आता या संकटातून वरुणराजाच ग्रामस्थांना मुक्त करणार आहे. मात्र गतवर्षीप्रमाणे पाऊस लांबला तर यापेक्षा भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत...
एरवी रस्ते, पूल, साकव, पाखाड्या या कामासाठी आटापिटा करणाऱ्या आणि श्रेयवादासाठी धडपडणाऱ्या लोकप्रतिनिधींनी भविष्यात लांजा तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रभावी उपायोजना व अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरून तालुक्यातील पाणीटंचाई दूर होईल त्या दृष्टीने लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही देखील प्रयत्न करावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:59 PM 25/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow