रत्नागिरी जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एच.पी.व्ही. (Human Papilloma Virus-HPV) लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ येथील कोकणनगरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी झाला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

यावेळी सौ. रानडे यांनी सांगितले की, यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात 9 ते 14 वर्षे वयोगटातील दहा हजारांहून अधिक मुलींनी एचपीव्ही लस घेतली असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत. मात्र सध्या समाजमाध्यमांवर एचपीव्ही लसीकरणाबाबत काही दिशाभूल करणारे व्हिडीओ व संदेश प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता शासकीय आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवावा. 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींनी ही लस घ्यावी व पालकांनीही आपल्या मुलींना लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाठ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे, कोकणनगर नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरगोजे, डॉ. अझर शेख, डॉ. नूतन सातघरे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, तसेच लाभार्थी व पालक उपस्थित होते.

Happy journey

ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) हा महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण मानला जातो. एचपीव्ही लस घेतल्यास या कर्करोगापासून प्रभावी संरक्षण मिळते. ही लस मोफत उपलब्ध असून 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींनी लसीकरण करून आपल्या आरोग्याचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले. अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:47 10-03-2026