मंडणगड: मंडणगड तालुक्यात गेल्या दोन दिवसांत रस्ते अपघातांच्या दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत. खेड-पुरार राज्यमार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे आंबडवे-लोणंद महामार्गावर कार अपघातात एक महिला डॉक्टर गंभीर जखमी झाली आहे. या दोन घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
१. खेड-पुरार मार्गावर दुचाकी घसरली, तरुण ठार
रविवारी सकाळी ८:३० च्या सुमारास खेड-पुरार राज्यमार्गावर पालघर ते कुंबळे दरम्यान भीषण अपघात झाला. कल्पेश प्रकाश आदावडे (वय ३५, रा. चिखलगाव-दापोली) हा आपल्या दुचाकीने (एमएच ०८ एबी ४४२२) प्रवास करत असताना त्याला डुलकी लागल्याने दुचाकी रस्त्याबाहेर जाऊन खड्यात कोसळली. या दुर्दैवी अपघातात कल्पेशचा जागीच मृत्यू झाला, तर सहप्रवासी विलास पांडुरंग मोहिते (वय ४८, रा. मंडणगड) हे गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी विलास मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडणगड पोलीस ठाण्यात मृत कल्पेश आदावडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्ता सुरक्षित असतानाही बेदरकारपणे आणि अतिवेगाने वाहन चालवून स्वतःच्या मृत्यूला आणि सहप्रवाशाच्या दुखापतीला कल्पेश कारणीभूत ठरल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.
२. आंबडवे-लोणंद मार्गावर महिला डॉक्टरचा भीषण अपघात
दुसरी घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आंबडवे-लोणंद महामार्गावर शिरगाव येथे घडली. डॉ. सबिया असद मुल्ला (वय ३२, रा. गोरेगाव-रायगड) या आपल्या मारुती स्विफ्ट कारने प्रवास करत असताना, चालकाने गाडी अतिवेगाने आणि चुकीच्या बाजूने चालवल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या मेटल बॅरीकेडला जाऊन धडकली.
या अपघातात डॉ. सबिया मुल्ला गंभीर जखमी झाल्या असून, गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना भिंगळोली ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार देऊन पुढील उपचारांसाठी तातडीने मुंबई येथे हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले.
वाहनचालकांसाठी आवाहन: सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर, वाहनचालकांनी महामार्गावर गाडी चालवताना अतिवेग टाळावा आणि थकवा जाणवत असल्यास गाडी बाजूला थांबवून विश्रांती घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 20-04-2026














