Ratnagiri Bartakke Institute Partnership: बारटक्के इन्स्टिट्यूट आणि एव्हीपी फ्युचरटेक यांच्यात सामंजस्य करार; विद्यार्थ्यांना मिळणार अत्याधुनिक एआय व डिजिटल प्रशिक्षण

Ratnagiri Bartakke Institute Partnership: बारटक्के इन्स्टिट्यूट आणि एव्हीपी फ्युचरटेक यांच्यात सामंजस्य करार; विद्यार्थ्यांना मिळणार अत्याधुनिक एआय व डिजिटल प्रशिक्षण

एआय टूल्स, जनरेटिव्ह एआय आणि डेटा ॲनालिटिक्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारा रोजगाराभिमुख कौशल्यांचा लाभ

*रत्नागिरी: *विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान आणि उद्योगाभिमुख कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात रोजगारासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या बारटक्के इन्स्टिट्यूट आणि ‘एव्हीपी फ्युचरटेक प्रा. लि.’ यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या या करारामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रकल्पाधारित प्रशिक्षण आणि उद्योगांच्या थेट गरजेनुसार कौशल्यविकासाच्या सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहेत.

शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील अंतर कमी करण्याचा मुख्य हेतू
शिक्षण संस्था आणि उद्योग क्षेत्र यांमधील अंतर कमी करून विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी तयार करणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे. या करारांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित शैक्षणिक कालावधीतच थेट प्रत्यक्ष प्रकल्पांवर (Live Projects) काम करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI Tools), जनरेटिव्ह एआय, डेटा ॲनालिटिक्स, ऑटोमेशन आणि डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या तांत्रिक क्षमतेसह समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित केले जाणार आहे.

Ratnagiri Bartakke Institute Partnership: तज्ज्ञांचे मार्गदर्शन अन् आधुनिक तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर
या उपक्रमांतर्गत ‘एव्हीपी फ्युचरटेक प्रा. लि.’ मधील अनुभवी तज्ज्ञ आणि आयटी क्षेत्रातील मार्गदर्शक विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. उद्योग जगतातील बदलत्या गरजांनुसार प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात नियमित सुधारणा केल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष आणि जबाबदार वापर करण्याचे प्रात्यक्षिक कौशल्य आत्मसात करता येईल. या उपक्रमाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आणि बारटक्के इन्स्टिट्यूट शालेय समितीच्या अध्यक्षा डॉ. कल्पना मेहता व सर्व समिती सदस्यांनी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

Tata motars tiago

"पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक" – अनुजा घारपुरे
या कराराबाबत माहिती देताना बारटक्के इन्स्टिट्यूटच्या समन्वयक सौ. अनुजा घारपुरे म्हणाल्या, "आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधारित युगात केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसे ठरू शकत नाही. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकणे ही काळाची गरज बनली आहे. एव्हीपी फ्युचरटेकसोबतच्या या करारामुळे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजेनुसार कौशल्ये विकसित करता येतील आणि त्यांच्या करिअरला एक नवी दिशा मिळेल."

तर, एव्हीपी फ्युचरटेकचे संचालक आविष्कार कांबळे यांनी सांगितले की, "विद्यार्थ्यांनी कोणतेही एक तंत्रज्ञान आपल्या शिक्षणात, रोजच्या कामात आणि नावीन्यपूर्ण विचारांमध्ये कसे आत्मसात करावे हे शिकणे अत्यंत आवश्यक आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. रत्नागिरी शहरातील विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी आम्ही विशेष भर देणार आहोत."