३० ऑक्टोबरपूर्वी निकाल येण्याची शक्यता
नवी दिल्ली: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (दि. १३) अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीदरम्यान शिंदे गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ मनिंदर सिंग हे युक्तिवाद करणार असून, ते प्रामुख्याने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर जोरदार बाजू मांडण्याची शक्यता आहे. या महत्त्वाच्या युक्तिवादावरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या राजकीय भवितव्याचा फैसला ठरणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.
मनिंदर सिंग यांच्या युक्तिवादाकडे सर्वांचे लक्ष; आमदार अपात्रतेवर होणार भर
मागील सुनावणींमध्ये शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी बाजू मांडताना, विधिमंडळातील बहुमताचा निकष अद्यापही वैध असल्याचा युक्तिवाद केला होता. तसेच, अपात्रतेचा अंतिम निर्णय होईपर्यंत आमदारांना अपात्र मानता येणार नाही, अशी भूमिका मांडली होती. कौल यांचा युक्तिवाद जवळपास पूर्ण झाला असला, तरी आज ते थोडावेळ बाजू मांडून नंतर ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग मुख्य युक्तिवाद पुढे चालवतील. मनिंदर सिंग हे आमदार अपात्रतेच्या कायदेशीर मुद्द्यावर भर देणार असल्याचे सांगितले जात असून, ते कोणकोणते नवे कायदेशीर दाखले देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज दुपारी २ वाजेनंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
निवडणूक आयोगाचा अधिकार आणि बहुमताचा निकष
यापूर्वीच्या सुनावणीत, निवडणूक आयोगाला प्रत्येक पक्षाच्या वादासाठी एकच निकष वापरणे बंधनकारक नसल्याचा युक्तिवाद शिंदे गटाने केला होता. शिवसेनेची २०१८ ची पक्षघटना निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा मुद्दाही वारंवार उपस्थित करण्यात आला आहे. आता आजच्या सुनावणीत न्यायालय यावर काय ताशेरे ओढते किंवा काय निर्देश देते, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Supreme Court Hearing Shiv Sena Case: ३० ऑक्टोबरपूर्वी सुनावणी पूर्ण करण्याचे संकेत
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ३० ऑक्टोबर २०२६ पूर्वी संपवण्याचे संकेत दिले आहेत. इतर प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तोंडी माहिती दिली होती की, त्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत शिवसेनेवरील प्रकरणाची सुनावणी पूर्ण करायची आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुमारास किंवा त्यानंतर या बहुप्रतिक्षित प्रकरणाचा अंतिम निकाल येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.













