विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: महिलांसाठी आरक्षणाची लवकर अंमलबजावणी करणाऱ्या विधेयकाला पाठिंबा न दिल्याबद्दल काँग्रेस आणि इतर पक्षांना त्याची किंमत मोजावी लागेल. तसेच केंद्रीय मंत्र्यांनी विरोधकांची “महिला-विरोधी” मानसिकता जनतेसमोर उघड करावी, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहकारी मंत्र्यांना शनिवारी दिला.

२०२९च्या लोकसभा निवडणुकीत महिलांचे आरक्षण लागू करण्यासाठी आपल्या सरकारचा असलेला भक्कम पाठिंबा आणि कटिबद्धता यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट बैठकीत पुनरुच्चार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी असेही म्हटले की, महिलांच्या आरक्षणाची लवकर अंमलबजावणी करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा न देणे ही विरोधकांची मोठी चूक आहे आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. हा संदेश तळागाळापर्यंत, प्रत्येक गावापर्यंत पोहोचवावा आणि विरोधकांची “महिला-विरोधी” मानसिकता उघड करावी.

कृतींवर पडदा टाकणार

लोकसभेत महिलांच्या आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी असलेल्या संविधान दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने ते मंजूर होऊ शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत असेही सांगितल्याचे समजते की, लोकसभेत घेतलेल्या भूमिकेनंतर आता विरोधी पक्ष आपल्या कृतीचे समर्थन करण्याचा व नकारात्मक गोष्टींवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनीही विरोधकांच्या भूमिकेवर चर्चा केली व मते मांडली.

तामिळनाडूला तोटा सहन करावा लागू शकतो

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सांगितले की, द्रमुक आणि त्यांचा मित्रपक्ष काँग्रेस यांच्या भूमिकेमुळे तामिळनाडूला संसद आणि राज्य विधानसभेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याची संधी गमवावी लागली. हट्टी, दूरदृष्टी नसलेल्या व महिलाविरोधी धोरण असलेल्या द्रमुकमुळे तमिळनाडूला फायदा होण्याऐवजी तोटा सहन करावा लागू शकतो असेही त्यांनी सांगितले.

भाजपचे विचार लोकांनी नाकारले

लोकसभेत संविधान दुरुस्ती विधेयकाचा पराभव हा भाजपचे विचार लोकांनी नाकारले आहेत याचे उदाहरण आहे असे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी शनिवारी सांगितले. ते म्हणाले की, महिलांसाठी आरक्षण देण्याच्या नावाखाली भाजपने संविधान बदलण्याचा, मागासवर्गीय व आदिवासी यांचे आरक्षण संपवण्याचा मोठा डाव रचला आहे.

विरोधकांनी केला माफ न करता येण्याजोगा गुन्हा

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाचा झालेला पराभव हा कधीही माफ न करता येण्याजोगा गुन्हा आहे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी सांगितले. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील निडदवोलू येथे एनडीएच्या सभेत ते म्हणाले की, महिलांचा आत्मविश्वास कमी व्हावा या हेतूने विरोधकांनी हे विधेयक अतिशय अवमानकारक पद्धतीने नाकारले. विधिमंडळांमध्ये महिलांचे अधिक प्रतिनिधित्व झाल्यास त्यांना योग्य सन्मान मिळेल, विकासाला चालना मिळेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 20-04-2026