Vande Mataram Protocol: सरकारी कार्यक्रमांमधील गीतक्रमात मोठा बदल; आधी ‘वंदे मातरम्’, मग ‘जन गण मन’

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर Vande Mataram Protocol मध्ये कायदेशीर बदल; ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन


नवी दिल्ली:

नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘राष्ट्रीय सन्मानाच्या अवमानास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, २०२६’ ला मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार सरकारी आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या गीतक्रमात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, आता सर्वांत आधी राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’, त्यांच्यानंतर राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि शेवटी राज्यगीत असा गायनाचा क्रम निश्चित राहणारा आहे. या कायद्यातील नव्या सुधारणेनुसार ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच वैधानिक संरक्षण मिळाले असून, आगामी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून प्रथमच संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गुंजणार आहे.

कायद्यात सुधारणा आणि दंडात्मक तरतुदी
‘राष्ट्रीय सन्मानाच्या अवमानास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, २०२६’ मुळे ‘राष्ट्रीय सन्मानाच्या अवमानास प्रतिबंध कायदा, १९७१’ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. याअंतर्गत राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या गायनादरम्यान जाणीवपूर्वक त्याचा अवमान करणे किंवा अडथळा आणणे हा दंडात्मक अपराध ठरणार आहे. राष्ट्रगीताचा अवमान व गायनात व्यत्ययासाठी ज्या दंडात्मक तरतुदी लागू होत्या, त्या आता ‘वंदे मातरम्’लाही लागू राहतील. हे विधेयक गेल्या महिन्यात पावसाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहाांनी संमत केले होते. विरोधी पक्षांच्या आक्षेपामुळे झालेल्या गोंधळातच या विधेयकाला मंजुरी मिळाली होती. संसदेच्या दोन्ही सभागृहांत संमत झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या मंजुरीने या सुधारणेने आता कायद्याचे रूप घेतले आहे.

‘हर घर तिरंगा’ अभियानात देशवासीयांनी सहभागी व्हावे: पंतप्रधान नरेंद्र मोदी
दुसऱ्या बाजूला, ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरातील जनतेला ‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक घरामध्ये उत्साहाने राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचे आवाहन त्यांनी केले. इन्स्टाग्रामवर या अभियानाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधानांनी देशवासीयांना ‘विकसित भारत’ घडवण्याचा संकल्प घेण्याचेही आवाहन केले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, १५ ऑगस्ट रोजी अत्यंत अभिमानाने आणि सन्मानाने स्वातंत्र्य दिन साजरा करा, स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहा आणि विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प घ्या. त्यांनी ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा, हर मन तिरंगा’चा नारा देत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, असे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:32 12-08-2026