रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण रेल्वे मार्गावर एका ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. निवसर ते आडवली रेल्वे स्थानकांदरम्यान चालत्या ट्रेनमधून पडून हा तरुण गंभीर जखमी झाला होता. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी (ता. १८) पहाटे त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नक्की काय घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित तरुण कोकण रेल्वेने प्रवास करत असताना निवसर ते आडवली दरम्यान चालत्या ट्रेनमधून खाली पडला. सुदैवाने, तिथे असलेल्या ट्रॅकमनला तो जखमी अवस्थेत दिसून आला. ट्रॅकमनने तत्काळ निवसर रेल्वे स्टेशन मास्तरांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी तरुणाला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) या तरुणावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, गंभीर दुखापतीमुळे शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
ग्रामीण पोलिसांकडून तपासाला सुरुवात
या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी ‘आकस्मिक मृत्यू’ (AD) म्हणून गुन्हा दाखल केला आहे. मृताचे वय अंदाजे ३५ वर्षे असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मृत तरुणाचे नाव, गाव किंवा पत्त्याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने पोलिसांसमोर आता त्याची ओळख पटवण्याचे आव्हान आहे.
नागरिकांना आवाहन:
मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. या तरुणाच्या नातेवाईकांची माहिती असल्यास किंवा कोणाला काही संशयास्पद माहिती असल्यास, नागरिकांनी तत्काळ रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:49 20-04-2026











