मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांची नोटीस धाब्यावर बसवून साहित्य हलवल्याने शहर पोलिसांत कारवाई
रत्नागिरी: शहरातील कर्ला जेटी येथील एका नौकेवरील साहित्य स्थलांतरित करू नये, असे स्पष्ट आदेश मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, हे आदेश धाब्यावर बसवून संशयित नौका मालकाने नौकेवरील साहित्य परस्पर स्थलांतरित केले. शासकीय आदेशाची अवमानना केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुगंधा सचिन टाकळे (रा. पंधरामाड, मुरुगवाडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवार, ७ ऑक्टोबर ते शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कर्ला जेटी येथे घडली.
सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांची नोटीस ठरवली बेदखल
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी चिन्मय जोशी (वय ३०, रा. श्रेयस अपार्टमेंट, गोडबोले नगर, नाचणे रोड, रत्नागिरी) हे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी संशयित बोट मालक सुगंधा टाकळे यांना त्यांच्या ‘गुरुप्रसाद’ नावाच्या नौकेवरील साहित्य इतरत्र हलवू नये, अशी कायदेशीर नोटीस बजावली होती. असे असतानाही प्रशासकीय सूचनांकडे दुर्लक्ष करून नौकेवरील साहित्य नियमाविष्ठ रितीने स्थलांतरित करण्यात आले.
Ratnagiri Karla Jetty Boat Material Case: शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; प्रशासकीय वर्तुळात चर्चा
शासकीय अधिकृत आदेशाची अवमानना झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी चिन्मय जोशी यांनी या प्रकरणी थेट रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित महिला मालक सुगंधा टाकळे यांच्याविरुद्ध शासकीय आदेशाची अवज्ञा केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या वर्तुळात एकच चर्चा सुरू असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.














