HSC Result 2026: बारावी निकाल अपडेट: २६ विषयांचा निकाल १०० टक्के! जाणून घ्या शाखानिहाय निकालाची आकडेवारी

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज घोषित केला. राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात २.०९ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून विभागीय निकालात कोकण विभागाने आपला दबदबा कायम राखला आहे.

मुलींची बाजी आणि मुलांची कामगिरी

यंदाच्या निकालात मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे.

  • उत्तीर्ण मुली: ९३.१५ टक्के
  • उत्तीर्ण मुले: ८६.८० टक्के

विभागीय निकालात कोण पुढे, कोण मागे?

राज्यातील ९ विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने ९४.१४ टक्क्यांसह पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजेच ८४.१४ टक्के इतका लागला आहे.

शाखानिहाय निकालाची आकडेवारी

यंदा विविध शाखांच्या निकालातही मोठी चुरस पाहायला मिळाली. विशेषतः कला शाखेचा निकाल सर्वाधिक लागला आहे.

  • कला (Arts): ९८.०२ टक्के
  • विज्ञान (Science): ९६.४४ टक्के
  • वाणिज्य (Commerce): ८७.०३ टक्के
  • व्यवसाय अभ्यासक्रम (Vocational): ८२.७४ टक्के
  • आयटीआय (ITI): ८१.७८ टक्के

विज्ञान शाखेच्या निकालाची तुलना (मागील ४ वर्षे)

विज्ञान शाखेच्या निकालात गेल्या काही वर्षांत चढ-उतार पाहायला मिळाले आहेत:

  • २०२३: ९०.९६ %
  • २०२४: ९७.८२ %
  • २०२५: ९७.३५ %
  • २०२६: ९६.४४ %

२६ विषयांचा निकाल १०० टक्के!

यंदा एकूण १५३ विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे, ही बोर्डासाठी जमेची बाजू मानली जात आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी किंवा फोटोकॉपी हवी आहे, त्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून विहित नमुन्यात अर्ज करावा. दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 02-05-2026